चारीत्र्याच्या संशयावरून नवऱ्याने केला पत्नीचा गळा दाबून खून…

2

चिंदर सडेवाडी येथील घटना…

आचरा, ता. २६ : चारीत्र्याच्या संशयावरून वाद विकोपाला जाऊन नवऱ्याने राहत्या घरातच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना चिंदर सडेवाडी येथे आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत संशयित आरोपी अमित दत्तात्रय मुळे (वय- ३०) याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे चिंदरमध्ये खळबळ उडाली आहे.
सौ. अनुराधा अमित मुळे पुर्वाश्रमीच्या दर्शना मनोहर घाडीगांवकर त्रिंबक देवूळवाडी (वय- २८) या सध्या सासरवाड चिंदर सडेवाडी येथे सासु सासरे पती व दोन वर्षांच्या मुलासह राहत होत्या. सहा महिन्यांपुर्वी त्या मुंबई येथून गावी राहण्यासाठी आल्या होत्या. घरगुती कारणावरून त्यांच्यात किरकोळ भांडणं होत असल्याचे बोलले जात होते. आज तब्येत बरी नाही म्हणून सासूबाई आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्या होत्या.
याबाबत मयत अनुराधा हिचा भाऊ लक्ष्मण मनोहर घाडीगांवकर याने आचरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आपल्या बहिणीचा आणि अमितचा ९ वर्षापुर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन वर्षाचा मुलगा आहे. आठ दिवसांपूर्वी जेव्हा बहिण त्रिंबकला माहेरी आली होती तेव्हा चारीत्र्याच्या संशयावरून नवरा आपल्याशी भांडण करत असल्याचे सांगितले होते. आज दुपारी झालेल्या वादात वाद विकोपाला जाऊन आरोपी अमित मुळे याने रागाने पत्नी अनुराधाचा गळा दाबून धरला यातच तीचा मृत्यू झाला. घाबरुन घरापासून काही अंतरावर शेतमांगरात राहणाऱ्या आपल्या भावाला आपली पत्नी निपचित पडली असल्याचे सांगितले. अमितच्या भाऊ आणि भावजयने अनुराधा बेशुद्ध असेल या जाणीवेने आपल्या गाडीतून प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते. खबर समजताच वाहतूक पोलिस कर्मचारी विनायक साटम यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित घटनेची माहिती घेतली. यावेळी तपासासाठी आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. एच. कळेकर यांनी आरोपीला प्राथमिक आरोग्य केंद्र येथून ताब्यात घेतले. आचरा येथे आलेले उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन करेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील चव्हाण, बाळू कांबळे, अक्षय धेंडे आदी करत आहेत.

4

4