राणे मुंबईत….प्रवेशाच्या गडबडीत…

2

सिंधुदुर्गात मात्र त्यांना घेरण्यासाठी,विरोधकांकडुन डावपेचाची आखणी

सिंधुदुर्गनगरी / विनोद दळवी ता. २७ :
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. नारायण राणे आपला पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करण्याच्या गडबडित असताना त्यांना घेरण्याचे राजकीय डावपेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी आखताना दिसत आहेत. त्यासाठी दिवसामध्ये किमान एक बैठक त्यांच्या विरोधकांची सुरु आहे. २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खा. राणे व त्यांचा मोठा पुत्र नीलेश यांचा पराभव केल्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा नीलेश यांचा पराभव करण्यात विरोधकांना यश आले. त्यामुळे पिता-पुत्रांना लोकनियुक्त राजकारणात पराभूत केल्यानंतर खा. राणे यांचे दूसरे पुत्र आ. नितेश राणे यांना कणकवलीतून पराभूत करण्याचा चंग विरोधक बांधत आहेत. या विधानसभा निवडणुकीत नितेश यांचा पराभव झाल्यास अनेक वर्षे जिल्ह्यावर सत्ता असलेल्या राणे कुटुंबाचा जिल्ह्याच्या राजकारणातील थेट सबंध संपेल. त्यामुळे राणेमुक्त जिल्हा होईल, असा प्रयत्न सध्यातरी विरोधक करताना दिसत आहेत.
राज्याच्या राजकारणात सर्वाधिक इनकमिंग भाजप पक्षात होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र ते इनकमिंग शिवसेना पक्षात होताना दिसत आहे. कुडाळ-मालवणमध्ये वैभव नाईक यांनी पक्षप्रवेश घेण्याचा विक्रमच सुरु केला असून पक्ष प्रवेशानेच विरोधकांना धडकी भरली पाहिजे, असे आ नाईक यांनीच सांगितले आहे. यात नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भरणा आहे. माजी पंचायत समिती सदस्य असो किंवा सरपंच त्यांचे प्रवेश थेट मातोश्रीवर पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून घेतले जात आहेत. सावंतवाडीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पर्सनेट जाळे टाकलेले आहे. जाळ्यात मासे मिळालेले आहेत. योग्य वेळ येण्याचा मुहूर्त ते शोधत आहेत. ती वेळ आल्यावर ते जाळे किनारी आणणार आहेत. या जाळ्यात (राजकीय दृष्टया) किती किमतीचे मासे आहेत ते किनारी आल्यावर स्पष्ट होईल.
विरोधकांना राणे हे नाव जिल्ह्याच्या राजकारणातून फुसुन टाकायचे आहे. त्यासाठी त्यांनी ‘कणकवली अभी बाकी है’ असा नारा दिला आहे. सावंतवाडीत बोलताना दोन दिवसांपूर्वी केसरकर यांनी “अधिकाऱ्यांवर चिखल ओतणारी प्रवृत्ती संपली पाहिजे”, असे भाष्य केले होते. त्यानंतर शिवसेनेच्या अनारोजीन लोबो यांनी कणकवलीत बोलताना तीच री ओढताना ‘काही उंदीर शिल्लक राहिल्या’चे वक्तव्य केले आहे. गुरुवारी कणकवली विधानसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी यांची खा. विनायक राऊत यांनी बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना- भाजप युती झाली आणि हा मतदार संघ भाजपला सुटला असला तरी नको असलेला उमेदवार दिल्यास आपला अमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा नको असलेला उमेदवार म्हणजे आ. नितेश राणे. राणे भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपने याठिकाणी नितेश राणे यांना उमेदवारी दिली तर शिवसेना आपला उमेदवार उभा करणार आहे. त्याठिकाणी राणे सोडून दूसरा उमेदवार उभा केल्यास युती धर्म पाळला जाणार आहे. याचाच अर्थ विरोधकांना राणे कुटुंबातील व्यक्ती नको. दूसरा कोणही चालेल. मग राणे समर्थक असलातरी शिवसेना काम करेल ?
राणेंचा भाजप प्रवेश झाला आणि शिवसेनेला नको असलेला उमेदवार दिला गेला तर येथे युती धर्म पाळला जाणार नाही. शिवसेना स्वतंत्र उमेदवार उभा करणार. त्यासाठी पडदयामागच्या हालचाली सुरु आहेत. राणेंच्या घरातील म्हणजेच जवळचा व सक्षम पदाधिकारी फोडून त्याला उमेदवारी देण्यात येणार आहे. राणे यांनी भाजपात प्रवेश केला तरी काही भाजप पदाधिकारी शिवसेनेच्या या युती विरोधी बंडखोरीत सक्रीय सहभागी होणार आहेत. तसे नियोजन झाल्याचे समजते. त्यामुळे राणे स्वाभिमान पक्ष म्हणून लढणार की भाजप म्हणून लढणार, हे निश्चित झाल्यावर विरोधकांनी रचलेल्या चक्रव्यूहातून कसे बाहेर पडणार ? की चक्रव्यहात फसणार ? हे २४ ऑक्टोबरला स्पष्ट होईल.

6

4