सावंतवाडी,ता.२३: इन्सुली घाट येथे झालेल्या एसटी बस व ट्रक अपघातात एसटी चालक प्रविण आचरेकर यांच्यासह बस मधील २४ प्रवाशी जखमी झाले. तर ट्रकचालक केबीनमध्ये अडकून पडला होता. दरम्यान प्रवाश्यांच्या नाका तोंडाला मार बसल्याने रक्तस्राव झाला. त्यांना तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच गंभीर जखमी झालेल्या ट्रक चालक व क्लिनरला उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. आशिष सावंत, बाबू शिंदे अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडला.
दरम्यान अडकलेल्या ट्रक चालकाला बाहेर काढण्यासाठी तसेच अपघातग्रस्तांना मदतीसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य, माजगाव, इन्सुली, चराठा, बांदा, सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते, युवक, ग्रामस्थांनी धाव घेतली. यामुळे बचावकार्याला गती मिळाली. सावंतवाडी आगराचे प्रांजल धुरी, रेश्मा सावंत, केके यादव आदींनी जखमी प्रवाशांचा महामंडळातर्फे मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबचता अर्ज भरून घेतला. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.