वेंगुर्लेतील निशाण तलावाची उंची वाढविण्याच्या कामाला अखेर मंजूरी

2

नगराध्यक्ष दिलीप गिरप यांची माहिती

वेंगुर्ले : ता.२७ : गेल्या १० वर्षापासून रखडलेल्या निशाण तलावाची उंची वाढविण्याच्या कामाला अखेर मंजूरी मिळाली असून त्याची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे. विहित प्रक्रियेनुसार १७ सप्टेंबर रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. सदर बांधकामासाठी २४ महिन्यांची मुदत दिलेली असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली. दरम्यान, दीर्घकाळ लाल फितीत अडकलेला हा प्रलंबित प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण झाल्यास वेंगुर्ल्यातील पाणी टंचाईच्या प्रश्नी नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेला पाणी पुरवठा करणारा निशाण तलाव हा मुख्य स्त्रोत आहे. या तलावाची प्रशासकीय मंजूरी ३ एप्रिल १९९८ रोजी मिळालेली होती. १७५५.३० लक्ष मिळालेल्या रक्कमेतून जलशुद्धीकरण केंद्र, वडखोल येथे टाकीचे बांधकाम, वितरण व्यवस्था आणि तलावाचे बांधकाम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून झालेले आहे. सदरच्या रक्कमेतून वेंगुर्ला, तुळस, मठ येथील १७-६४-४ हे.आर.क्षेत्र एवढे भूसंपादित करण्यात आलेले आहे. या जमिनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या ताब्यात आलेल्या असून ही पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेला हस्तांतरीत केलेली आहे.
सदरच्या तलावाचे बांधकाम पूर्ण होऊनही शहराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने सन २००८ पासून निशाण तलावाची उंची वाढविण्याची मागणी वेंगुर्ला नगरपरिषदेने केलेली होती. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली होती. निशाण तलावाची उंची वाढविण्यासाठी नगराध्यक्ष दिलीप गिरप व त्यांचे सहकारी यांनी पाठपुरावा चालू ठेवला होता. पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर व पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांच्या समवेत वेळोवेळी बैठका आयोजित केल्या. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तलावासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची पूर्तता पाणीपुरवठा विभागाने केली.
सद्यस्थितीत तलावाची पाणी साठवणूक क्षमता कमी असल्याने गोडबोल गेटचा दरवाजा १५ ऑगस्टला बंद करण्यात येतो. त्यापूर्वी जूनपासून पडणाऱ्या पावसाचे पाणी सोडून देण्यात येते. त्यामुळे पाणी पुरवठा योजना टप्पा क्र.२ मधील तलावाची उंची अडीच मिटरने वाढल्यास हे वाया जाणारे पाणी साठवून ठेवता येऊ शकते. हे काम लवकरात लवकर करुन घेण्यासाठी नगरपरिषद महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधून काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या दूर होणार असल्याने नागरीकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 

6

4