शासनाने वाऱ्यावर सोडलेल्या सुरक्षा रक्षकांचा मतदानावर बहिष्कार

2

आत्महत्या केलेल्या हिंगणे रक्षकाच्या नातेवाइकांना मदत देण्याची मागणी

सिंधुदुर्गनगरी.ता,२७: सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील सुरुक्षा रक्षकांकडे सरकार आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्या मागण्या गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे कोपर रोड येथील सुरक्षा रक्षक संतोष हिंगणे याने आत्महत्या केली आहे. परिणामी सुरक्षा रक्षकांमध्ये असंतोष पसरला असून आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा देतानाच हिंगणे यांच्या कुटुंबाला शासनाने तात्काळ मदत द्यावी अन्यथा आचारसंहिता संपल्यावर शासनाविरोधात आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती सुरक्षा रक्षक विजय गुरव व भूषण परब यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना वेळेवर मानधन मिळत नाही. त्यांच्या विविध मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत. अनेक वेळा मागण्यांबाबत पाठपुरवा करूनही त्यांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांमध्ये नैराश्यतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातूनच कोपर रोड येथील संतोष हिंगणे (४५) या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केली. तसेच आणखी काही सुरक्षा रक्षक आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे शासनाने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा सुरक्षा रक्षक आणि त्यांचे कुटुंब आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकणार आहेत, अशी माहिती सुरक्षा रक्षक विजय गुरव यांनी दिली.

….अन्यथा शासनाविरोधात आंदोलन छेडू

शासनाच्या बेजबाबदारीमुळे सुरक्षा रक्षक संतोष हिंगणे यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे शासनाने हिंगणे यांच्या कुटुंबाला तात्काळ मदत करावी अशी मागणी सुरक्षा रक्षकांकडून केली जात आहे. तसेच शासनाने मदत न केल्यास आचारसंहिता संपल्यावर सुरक्षा रक्षक शासनाविरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही या सुरक्षा रक्षकांनी दिला आहे.

13

4