भूमिपूजन झालेल्या मोबाईल टॉवरच्या कामांना फंडच नाही…

2

 

गावातील दूरध्वनी दोन महिने बंद ; परुळेकर, घाडीगावकर यांच्याकडून अधिकारी फैलावर…

मालवण, ता. २७ : ग्रामीण भागातील अनेक गावांमधील दूरध्वनी दोन महिने बंद असतानाही त्यांना बीएसएनएलकडून हजारो रुपयांची बिले पाठविण्यात आली आहे. या विषयावरून पंचायत समिती सदस्य राजू परुळेकर, सुनील घाडीगावकर यांनी बीएसएनएलच्या अधिकार्‍याला फैलावर घेतले. कामगार नाहीत हा तुमचा प्रश्‍न आहे. एक्स्चेंजमध्ये कामगार नसेल तर आमच्या तक्रारी पाहणार कोण? असा सवाल उपस्थित करत दूरध्वनीची बिले कमी करावीत तसेच बंदावस्थेतील दूरध्वनी तत्काळ सुरू करावेत अशी मागणी श्री. परुळेकर यांनी केली.
शिरवंडे गावात मोबाईल टॉवर मंजूर नसतानाही काही लोक तो मंजूर असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे याची लेखी माहिती द्यावी. तालुक्यात भूमिपूजन झालेल्या टॉवरच्या कामांसाठी फंडच उपलब्ध नसल्याचे बीएसएनएल अधिकार्‍याने सांगितल्याने सत्ताधारी जनतेला फसवित असल्याचा आरोप श्री. घाडीगावकर यांनी केला.
मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती सोनाली कोदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगावकर, राजू परुळेकर, अजिंक्य पाताडे, विनोद आळवे, कमलाकर गावडे, मनीषा वराडकर, गायत्री ठाकूर, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील निरोम, मठबुद्रुक, श्रावण यासह परिसरातील अन्य गावातील दूरध्वनी गेले दोन महिने बंद असतानाही त्यांना हजारो रुपयांची बिले पाठविण्यात आली आहे. ग्राहकांच्या तक्रारीही पाहिल्या जात नाहीत असे परुळेकर यांनी सांगितले. यावर गावातील दूरध्वनी सुरू असल्याचे सांगताच सभागृहाला खोटी माहिती देऊ नका असे परुळेकर यांनी सुनावले. लाईन फॉल्टमुळे दूरध्वनी बंद असण्याची शक्यता वर्तवित आवश्यक कार्यवाही तत्काळ करू असे अधिकार्‍यांनी सांगितले. शिवाय दूरध्वनी बिलेही कमी करून दिली जातील असे स्पष्ट केले.
तालुक्यातील मोबाईल टॉवरची कामे फंड नसल्याने सुरू झाली आहेत. त्यामुळे याबाबतची माहिती घेण्यासाठी मोबाईल युनीटच्या अधिकार्‍यांना पुढील बैठकीस उपस्थित राहण्यासाठी पत्रव्यवहार करण्याचे ठरले. एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्यावतीने तालुक्यात पोषण पंगत हा उपक्रम राबविला जाणार आहे. पोषण या संकल्पनेस प्रोत्साहन द्यायचे असल्याने सदस्यांनी आपआपल्यापरीने या उपक्रमात योगदान द्यावे असे आवाहन गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी केले. २ ऑक्टोबरपासून तालुक्यात प्लॅस्टिक पिकअप डे अभियान राबविले जाणार आहे. यात गावागावातील प्लॅस्टिकचा विविध प्रकारचा कचरा गोळा करून तो एकत्रित करत भंगारात दिला जाणार आहे. या अभियानासाठी तीन ग्रामपंचायतीसाठी एक नोडल अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे. या अभियानातही सर्व सदस्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी विभागाने त्यांचे तत्काळ पंचनामे करावेत अशी मागणी कमलाकर गावडे यांनी केली.

1

4