शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेपासून मागास समाज वंचित…

2

रावजी यादव यांचा आरोप…

सिंधुदुर्गनगरी, ता. २७ : शासनाने २०१७-१८ पासून जिल्हा वार्षिक योजनेतून लोकसंख्येच्या प्रमाणात प्राप्त अनुदानाच्या ३ टक्के अनुदानातून नवबौद्ध, अनुसूचित जाती ( महार, चांभार) समाजाच्या वस्त्यांचा स्थानिक गरजेनुसार २ वर्षात पूर्ण होणारी नाविन्यपूर्ण योजना सुरू केली. ही योजना तयार करताना स्थानिकांच्या गरजेनुसार योजना बनविण्यास जिल्हाधिकारी यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या २४ एप्रिल २०१८ च्या पत्राने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विषय समिती सभापती, जिल्हा नियोजन समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, सर्व शासन अनुदानित महामंडळ सह सर्व कार्यालय प्रमुख यांना या समाजाच्या अत्यावश्यक योजनेचे प्रस्ताव देण्याचे आदेशही देण्यात आले. परंतू एकाही लोकप्रतिनिधीने, एकाही कार्यालय प्रमुखांनी प्रस्ताव दिले नाहीत. एवढेच नव्हे तर त्यासाठी गेले २ वर्ष ८६,२८,००० लाखांचे अनुदानाही जिल्हा नियोजन विभागास शासनाने दिले. या समाजाच्या योजनांचे अनुदान १०० टक्के खर्च होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयांने १७ लाख रुपये जाहिरातीवर खर्च केले. परंतु नाविन्यपूर्ण योजनेवर १ पैसा खर्च केला नाही, असा आरोप दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष रावजी गंगाराम यादव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
अनुदान उपलब्ध असताना ही सर्व विभाग प्रमुखांनी या समाजासाठी योजना बनविली नाही किंवा ही आपली असमर्थता शासनाला कळविलीही नाही. परंतू पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून दिले नाही. जर ही बाब नियोजन समितीचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून दिली असेल तर त्यांनी दुर्लक्ष का केला ? मात्र सर्व साधारण गटांसाठी प्रशासकीय यंत्रणेने जवळजवळ ६ कोटींच्या योजना राबविल्या. हा या समाजाप्रती शासनाचा दुजाभाव म्हणायचा ? की प्रशासकीय यंत्रणेचा भेदभाव ? कि लोकप्रतिनिधी यांचा भेदभाव म्हणायचा ?
एनकेनप्रकारे लोकप्रतिनिधी आणि शासन कर्ती जमातीने या नवबौद्ध महार चांभार समाजाला या योजनेपासून वंचित ठेवले. याचा जाब आणि किमान चालू वर्षी तरी या योजनेचा लाभ या समाजाला मिळण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांना मतदार राजाकडे मतांचा जोगवा मागण्यासाठी येतील तेव्हा हा समाज मतदार राजा, या समाजाचे नेते, या समाजाप्रती आपुलकी असलेले मतदार राजे संबंधितांना विचारतील का ? असा सवाल दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष रावजी गंगाराम यादव यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

2

4