मालवण, ता. २८ : माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे आणि कुटुंबियांनी आज येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि नारायणाचे दर्शन घेतले. यावेळी कुडाळ मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या माजी खासदार निलेश राणे आणि कणकवली मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्या विजयासाठी ग्रामदेवतेला साकडे घालण्यात आले.
खासदार नारायण राणे यांचे रामेश्वर नारायण मंदिर परिसरात आगमन होताच पारंपरिक वाद्यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. तर सुहासिनींच्या वतीने त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी नीलम राणे, प्रियांका राणे, अभिराज राणे उपस्थित होते. याठिकाणी रामेश्वर देवस्थानच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नारायण मंदिरात राणे कुटुंबाने ग्रामदेवतेचे दर्शन घेतल्यानंतर याठिकाणी निलेश राणे, नितेश राणे यांच्या विजयासाठी साकडे घालण्यात आले. यानंतर श्री रामेश्वर मंदिरात जाऊन राणे कुटुंबियांनी दर्शन घेतले. तेथेही निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या विजयासाठी साकडे घालण्यात आले.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, राजू वराडकर, ललित चव्हाण, निशय पालेकर, दिलीप बिरमोळे, दाजी सावजी, आबा हडकर, जगदीश गावकर, हरेश गावकर, नारायण लुडबे, विक्रांत नाईक, शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, बाळू नाटेकर, सोनाली पाटकर, ऋत्विक सामंत, पूजा करलकर, पूजा सरकारे, राणी पराडकर, वैष्णवी मोंडकर, महिमा मयेकर यांच्यासह भाजपा आणि शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.