कुणकवळे काव्या देसाई खून प्रकरण…

2

सासू-सासरे, चुलत सासऱ्याला सशर्त जामीन…

सिंधुदुर्गनगरी, ता. २७ :

सुनेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सासू सुचिता सुरेश देसाई (६०), सासरे सुरेश गोपाळ देसाई (६६) व चुलत सासरे अनिल गोपाळ देसाई (६३) सर्व रा. कुणकवळे यांना जिल्हा न्यायाधीश २ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यानी प्रत्येकी २५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. संशयितांच्यावतीने वकील संग्राम देसाई, सुहास साटम, अश्पाक शेख यांनी काम पाहिले.
२६ जून २०१९ रोजी मयत काव्या गोपाळ देसाई (२७) ही जेवण खाण आटोपल्यानंतर सासू सुचिता आणि ५ महिन्यांची मुलगी आरोही यांच्या सोबत घराच्या मधल्या खोलीत झोपली होती. तर पती गोपाळ, सासरे सुरेश व चुलत सासरे अनिल हे अन्यत्र झोपले होते. दरम्यान २७ रोजी सकाळी काव्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचा गळा दाबला गेल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल दिला होता.
याप्रकरणी दाखल फिर्यादी नुसार पती गोपाळ सुरेश देसाई. सासरा सुरेश गोपाळ देसाई, सासू सुचिता सुरेश देसाई आणि चुलत सासरा अनिल गोपाळ देसाई या चौघां विरुध्द भा. द. वि. कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गोपाळ याला २९ रोजी अटक झाली होती. ५ जुलै पर्यंतच्या पोलिस कोठडी नंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी न्यायलयीन कोठडी मंजूर केली होती. त्यानंतर त्याने जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. अद्याप तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर या प्रकरणी संशयित आरोपी गोपाळ यांच्या आई, वडील व चुलत काका यांच्यावरही संगनमत केल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सासु सासरे अणि चुलत सासरे यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्याच्यावर सुनावणी होत सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

1

4