सिंधुदुर्गनगरी, ता. २७ :
गांजा बाळगल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपी सईद कादर शेख (३८) याला विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी २० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. संशयिताच्या वतीने वकील संग्राम देसाई, सुहास साटम आणि अश्पाक शेख यांनी काम पाहिले.
कुडाळ एमआयडीसी येथे ३ किलो ४८ ग्रॅम वजनाचा गांजा २१ जुलै रोजी स्थानिक गुन्हा अन्वेषणने जप्त करत याप्रकरणी कुडाळ रेल्वेस्टेशन जवळील सईद कादर शेख ( वय ३८) याला अटक करून गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सईद ला न्यायालयाने प्रथम पोलिस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडीत असताना सईद याने आपल्या वकिलांमार्फत न्यायालयाकडे केलेला जामिन अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यान शेख याने पुन्हा न्यायालयकडे जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सुनावणी होवून जिल्हा विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी शेख याला २० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.