मालवण, ता. ३० : शहरातील भरड येथील महालक्ष्मी अपार्टमेंट लगतच्या विहिरीत पडलेल्या बैलास प्राणी मित्र आनंद बांबर्डेकर यांनी पालिकेचे कर्मचारी, माजी नगरसेवक यांच्या सहकार्याने बाहेर काढत जीवदान दिले.
भरड येथील महालक्ष्मी अपार्टमेंट लगतच्या एका विहिरीत बैल पडला असल्याचे अपार्टमेंटचे काम करणाऱ्या एका कामगारास दिसून आले. त्यांनी याची माहिती मालक निलेश नाईक यांना दिली. त्यानुसार श्री. नाईक यांनी पाहणी करत याबाबतची माहिती प्राणिमित्र, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, माजी नगरसेवक यतीन खोत यांना देताच त्यांनी प्राणिमित्र आनंद बांबर्डेकर तसेच पालिकेचे कर्मचारी आनंद वळंजू यांना देत घटनास्थळी पाचारण केले. पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या बैलास बाहेर काढण्यात यश आले. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने त्या बैलाच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. मात्र त्याला वाचविण्यात यश आल्याने माजी नगरसेवक येथील खोत यांनी प्राणिमित्र बांबर्डेकर व पालिकेचे कर्मचारी यांचे आभार मानले.