इतिवृत्ताच्या चुकीवरून वेंगुर्ले पं.स. सभेत वादंग 

2

सदस्य आक्रमक : कारवाई करण्याचे सभापतींचे आदेश

वेंगुर्ले : ता. २७ : इतिवृत्ताच्या चुकीवरून अनेक वेळा वेंगुर्ले पं.स. सभेत वादंग होत असतात. आजही तोच प्रकार पुन्हा घडला. आजच्या इतिवृत्ता मध्ये चक्क माजी सदस्य समाधान बांदवलकर यांच्या नावाचा सूचक म्हणून उल्लेख करून प्रशासनाने या इतिवृत्ताच्या प्रति सर्व सदस्यांसह अधिकारी व लोकप्रतिनिधींना पाठविल्या. आणि आजच्या सभेत सुधारित इतिवृत्त देऊन प्रशासनाने चुक झाकण्याचा प्रयत्न केला परंतु सदस्यांनी या गंभीर प्रकरणावरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत या इतिवृत्ताला मंजुरीही दिली नाही. यावर सभापतींनी कारवाई करण्याचे किंवा संबंधितांना ट्रेनिंगला पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा पं. स. च्या बॅ. नाथ पै. सभागृहात सभापती सुनिल मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपसभापती स्मिता दामले, पं. स. सदस्य सिध्देश परब, मंगेश कामत, अनुश्री कांबळी, प्रणाली बंगे, गौरवी मडवळ, गट विकास अधिकारी उमा पाटील व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. आजच्या सभेत सदस्य सिद्धेश परब यांनी सांगितले की इतिवृत्ता मध्ये ३०८ मुद्याच नेमकं काय झालं ते कळलेच नाही. आम्ही वेळ जात नाही म्हणून सभेत येत नाही असे चालत राहिले तर आम्ही सभेला का यायच असा खडा सवाल उपस्थित केला. तसेच या विरोधात कारवाई झालीच पाहिजे असे सांगितले.
सभेच्या सुरुवातीस पंचायत समितीच्या मासिक सभेस विविध खात्याचे अधिकारी वेळीच उपस्थित राहात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
अतिवृष्टीमुळे रेडी भागात नारळ, सुपारी पिकाच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीची कृषि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पहाणी करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी सुचना आपण मागील सभेत करुन त्याचा वेळोवेळी पाठपुरावाही केला होता. मात्र कृषि अधिकाऱ्यांनी चुकीच्या पध्दतीने सर्वे केला असल्याबद्दल सदस्य मंगेश कामत यांनी नाराजी व्यक्त केली. यावर जोरदार चर्चा झाल्यावर पंचायत समितीच्या सभेतील सुचनांचे अधिकाऱ्यांनी पालन न केल्यास यापुढे त्यांची गय केली जाणार नाही असे सभापती सुनिल मोरजकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले. उभादांंडा आडारी येथील विद्युत लाईन खाली आल्याने धोका निर्माण झाला असल्याचे सदस्या अनुश्री कांबळी यांनी सांगितले. यावेळी अनेक विषयावर चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ठराव झाले नाहीत.

13

4