पोलीस तपासात निष्पन्न; कोणताही राजकीय हेतू नाही, पोलीस निरीक्षकांचे म्हणणे…
सावंतवाडी ता.३१: भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीसमोर बांबू घेवून आलेला झारखंड येथील संजय गोफ हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.तशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
दरम्यान तो गाडी थांबवण्यासाठी हातात बांबू घेवून थांबला होता. त्यामुळे गैरसमज झाला. मात्र त्या प्रकारामध्ये हल्ल्याचा कोणताही हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिले आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना काल रात्री मळगाव येथे घडली होती. मात्र या प्रकारामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता. तो संबंधित व्यक्ती ह मनोरुग्ण आहे. त्याचा सहकारी विनोद गोफ हे दोघे काम शोधण्यासाठी आरोंदा येथे आले होते. तेथून परतून कणकवली येथे जाण्यासाठी ते रेल्वेत बसले. परंतु डोके दुखत असल्यामुळे संजय उतरला. मात्र त्यानंतर त्याला अंदाज आला नाही. त्यामुळे गाडी थांबवण्यासाठी त्यांनी हातात बांबू घेऊन पुढील प्रकार केला. त्यात कोणताही राजकीय हेतू नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.