आशिष सुभेदार; उपरकर कट्टर शिवसैनिक, तुमच्या सारखा एका रात्रीत पक्ष बदलला नाही…
सावंतवाडी,ता.०१: काही झाले तरी विधानसभा लढणारच असे सांगणार्या संजू परबांनी निवडणूकीतून माघार घेण्यासाठी दीपक केसरकरांकडुन नेमके किती कोटी घेतले? हे जाहीर करावे. आता त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी लगावला आहे. दरम्यान निलेश राणे हेच आमचे नेते असे सांगणार्या परबांनी
शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मध्यरात्री विनायक राऊतांची भेट घेतली होती आणि प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. मग त्यांचे राणेंवरील प्रेम बेगडी म्हणायचे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. परब यांनी ठाकरे सेनेच्या नेत्यांवर टिका केली होती. यावेळी उपरकर हे ब्लॅकमेलर असे त्यांनी म्हटले होते. याला श्री. सुभेदार यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून टिका केली आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, उपरकरांवर आरोप करणारे परब हे जमिनीचे दलाल आहेत. त्यांनी जमिनीच्या व्यवहारात अनेकांना फसवले आहे. त्यांच्या विरोधात महिलांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण केले होते. शिरवल येथे झालेल्या जमिन गैरव्यवहार प्रकरणात त्याचे नाव होते. त्यामुळे त्यांनी निष्ठेच्या गोष्टी सांगू नयेत. आपण विधानसभा लढणारच, अन्यथा नगराध्यक्षपदाचा शब्द आणि ३ कोटी घेणार असे सांगणार्या संजू परबांनी आता केसरकरांकडुन नेमके किती कोटी घेतले? याची माहिती द्यावी. आमचे नेते उपरकर हे कट्टर शिवसैनिक आहेत. तुमच्या सारखे एका रात्रीत त्यांनी कमळ ठेवून धनुष्यबाण हातात घेतला नाही, असे त्यांनी यात म्हटले आहे.