अनिल केसरकर; जो उमेदवार रोजगार, आरोग्याच्या प्रश्नांना प्राधान्य देईल त्याला पाठिंबा…
सावंतवाडी,ता.०५: आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेला सर्व पर्याय खुले असून कोणीही मनसेला या पुढे ग्रुहित धरू नये, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिला आहे. दरम्यान अनेक वर्ष जनतेचे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. केवळ हवेतील आश्वासने देण्यापलीकडे कोणीही जनतेसाठी काम केलेल नाही. त्यामुळे जो उमेदवार रोजगार वा आरोग्य या महत्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देईल त्याच्याच पाठीमागे मनसेची पूर्ण ताकत उभी करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया ही त्यांनी दिली. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महायुतीचे काम करून नारायण राणे यांना विजयी करण्यासाठी योगदान दिले होते. मात्र आता विधानसभा निवडणुकीत मनसेला कोणीही ग्रुहित धरू नये. मागील अनेक वर्ष जनतेचे प्रलंबित असलेले रोजगार, आरोग्य, पाणी, चांगले रस्ते व इतर मूलभूत सुविधा या प्रश्नांची सोडवणूक करण्यात सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. केवळ हवेतील आश्वासने देण्यापलीकडे कोणीही जनतेसाठी काम केलेल नाही. त्यामुळे लोकांमध्ये असलेला रोष विचारात घेता या पुढे जो उमेदवार खरोखर रोजगार वा आरोग्य या महत्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देईल त्याच्याच पाठीमागे सावंतवाडी विधानसभा मतदार संघात मनसेची पूर्ण ताकत उभी करण्यात येईल. मात्र तत्पूर्वी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मते जाणून घेतली जातील त्यामुळे कोणीही मनसेला ग्रुहित धरू नये असा इशारा श्री. केसरकर यांनी दिला आहे.