सोनसाखळीसह अंगठी लंपास; दोघा अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल…
सावंतवाडी,ता.०७: पोलिस अधिकारी आहे. बाजूला चोरी झाली आहे, असे सांगून अज्ञात दोघा चोरट्यांनी सावंतवाडी सेवानिवृत्त वृध्दाला गंडा घातला आहे. त्याच्याकडे असलेल्या साठ हजाराच्या किमतीची अंगठी व चैन पुडीत बांधून देतो असे सांगुन त्यांनी ते दागिने लंपास केले आहेत. ही घटना आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास खासकीलवाडा जे.जे.मेडीकल परिसरात घडली. विठ्ठल बळवंत देसाई (वय ७४, रा. कठंकपाणंद, मुळ रा.नांगरतास-सरमळे) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कठंकपाणंद परिसरात राहणारे श्री. देसाई हे काही कामा निमित्त जे.जे. मेडीकल परिसरात गेले होते. तेथून परतत असताना समोरुन दुचाकीने येणार्या दोघा तरुणांनी त्यांना पुढे काही तरी झाले आहे. त्यामुळे तुमचे दागिने जपून ठेवा मी पोलिस इन्सपेक्टर आहे, असे सांगुन त्यांचे दागिने काढण्यास सांगितले. तसेच पुडीत बंद करून देतो, असे सांगुन हात चालाखीने ते लंपास केले. श्री. देसाई हे पुडी घेवून घरी गेले असता त्या पुडीत दागिने नसल्याचे उघड झाले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबतची तक्रार पोलिसात दिली आहे. त्यानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक माधुरी मुळीक या करीत आहे.