मोफत सुविधा न दिल्यास आंदोलन : कोकण विकास संघर्ष समितीचा इशारा
कणकवली, ता.२८ : कणकवली बसस्थानकातील स्वच्छतागृहात पुरुषांसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तर महिलांसाठी मात्र पाच रुपये घेतले जातात. ही बाब चुकीची आहे. महिलांसाठीही स्वच्छतागृह मोफत असायला हवे. याबाबतची कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा कोकण विकास संघर्ष समितीने कणकवली आगार व्यवस्थापकांना आज दिला. त्याबाबतचे निवेदनही देण्यात आले.
कोकण विकास संघर्ष समितीच्या अध्यक्षा अॅड.मनाली वंजारे, नारायण जाधव, वासंती तेंडोलकर, अॅड.सुदीप कांबळे, अभिषेक कदम, सायरा बागवान, सविता जाधव आदींनी आज कणकवली एस.टी.आगार व्यवस्थापक प्रमोद यादव यांची भेट घेतली. यावेळी कणकवली बसस्थानकात पुरुष आणि स्त्रियांसाठी होणारा भेदभाव, तसेच महिलांना मोफत स्वच्छतागृह असताना, प्रत्येकी पाच रुपयाचा आर्थिक भुर्दंड केला जात असल्याची बाब लक्षात आणून दिली.
जर पुरुषांना कोणतेही शुल्क आकारले जात नसेल तर महिलांसाठी पाच रुपये का घेतले जातात? सर्वच बसस्थानकात महिलांसाठी स्वच्छतागृहाची मोफत व्यवस्था असायला हवी. मात्र कणकवलीत शुल्क आकारणी केले जाते. शासनाने महिलांना दिलेले अधिकार, हक्क नाकारून तसेच नियमांचे उल्लंघन करून स्वच्छतागृहात पाच रुपये आकारणी केली जात आहे. ही बाब चुकीची असून महिलांकडून होणारी शुल्क आकारणी तातडीने थांबायला हवी. याबाबत दोन दिवसांत कार्यवाही झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अॅड.मनाली वंजारे, वासंती तेंडोलकर, सायरा बागवान, सविता जाधव, नारायण जाधव आदींनी आगार व्यवस्थापक प्रमोद यादव यांना दिला. तर श्री.यादव यांनी वरिष्ठांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय लवकर घेऊ अशी ग्वाही दिली.