विनायक राऊत ; मुलाच्या मतासाठी खासदाराला फिरावे लागते हेच माझ्या कामाचे यश – वैभव नाईक…
मालवण, ता. ०९ : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे १६० आमदार निवडून येतील. याची सुरवात कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांच्या विजयाने होईल असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला.
वायरी येथील आर. जी. चव्हाण मंगल कार्यालयात सायंकाळी महाविकास आघाडीचा मेळावा झाला. यावेळी आमदार वैभव नाईक, गौरीशंकर खोत, भाई गोवेकर, संजय पडते, श्रेया परब, पूनम चव्हाण, दिपाली शिंदे, जेम्स फर्नांडिस, मंदार शिरसाट, हरी खोबरेकर, नितीन वाळके, यतीन खोत, मीनाक्षी शिंदे, बाळ महाभोज, मंदार केणी, बाळू अंधारी, श्रीकृष्ण तळवडेकर, प्रमोद कांडरकर, उमेश मांजरेकर, श्वेता सावंत, ममता तळगावकर, प्राची माणगावकर, उल्हास तांडेल, मंदार गावडे, व्हीक्टर डांटस, डॉ. विश्वास साठे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. राऊत म्हणाले, सध्याचे सत्ताधारी हे भ्रष्टाचारी असून त्यांना त्यांची जागा या निवडणुकीत जनता दाखवेल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यापासून कोण रोखू शकत नाही. या मतदार संघाच्या विकासासाठी आमदार वैभव नाईकच हवेत. त्यामुळे त्यांच्या विजयासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने काम करत यश मिळवा असे आवाहन श्री. राऊत यांनी केले.
वैभव नाईक म्हणाले, विरोधक सांगत आहेत की वैभव नाईक यांनी मतदार संघात काय काम केले. मी जर काम केले नाही तर मग तुम्हाला घरोघरी फिरण्याची वेळ का आली? मुलाला मते मागण्यासाठी खासदाराला मतदार संघात फिरावे लागते हेच माझे काम आहे. शहरात अद्ययावत जेटी, नळपाणी योजना, छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर सुशोभीकरण यासह अनेक विकासात्मक कामे मार्गी लावण्यात आली आहेत. मच्छिमारांना अनेक योजनेचा लाभ मिळवून दिला. फयान, तोक्ते वादळात नुकसानग्रस्ताना आर्थिक मदत मिळवून दिली.
आजचे सत्ताधारी हे भ्रष्टाचारी आहेत हे महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर दिसून आले. पुतळा कोसळल्या नंतर आमच्यावर आरोप करत आठ दिवसात पुरावे देतो असे सांगितले गेले. मात्र ते पुरावे देऊ शकले नाहीत. कारण यात त्यांनीच भ्रष्टाचार केला असल्याचे निदर्शनास आले. पुतळा कोसळल्यानंतर राजकोट येथे जी अरेरावी करण्यात आली ती मालवणवासियांनी बघितली आहे. त्यामुळे येथील जनता या भ्रष्टाचारी लोकांना थारा देणार नाही. वादळाच्या काळात, कोरोना काळात आमदार कुठे होते आणि हे विरोधक कुठे होते हे कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेला सांगितले पाहिजे.
येत्या १३ तारखेला सायंकाळी चार वाजता टोपीवाला हायस्कुल येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेस सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री. नाईक यांनी यावेळी केले.
यावेळी गौरीशंकर खोत, मंदार केणी, उल्हास तांडेल, व्हीक्टर डांटस, महेश जावकर, बाळू अंधारी, पूनम चव्हाण यांनी आपले विचार मांडले.
सूत्रसंचालन नितीन वाळके यांनी केले. हरी खोबरेकर यांनी आभार मानले.