विशाल परब; सावंतवाडी मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन घेऊन निवडणूक रिंगणात…
सावंतवाडी,ता.११: गेल्या अनेक वर्षात विकासापासून वंचित राहिलेल्या सावंतवाडी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा निश्चय करून विधानसभेच्या रिंगणात उतरलो आहे. त्यामुळे माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून सावंतवाडी मतदार संघाचा विकास करण्यासाठी आपले अमूल्य मत मला द्यावे, असे आवाहन अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी केले आहे. कोणी कितीही माझ्यावर टीका केली तरी आपण त्याला उत्तर देणार नाही. लोकांचे प्रेम हेच माझी ताकद आहे. २३ तारखेला ती ताकद मतपेटीतून दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघात फिरताना युवा वर्गाचे आणि महिलांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत. रोजगार नसल्यामुळे युवा वर्गाला गोवा तसेच अन्य ठिकाणी जावे लागत आहे. तर महिलांच्या हाताला काम नसल्यामुळे अनेक कुटुंबाची परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे विकासाचे व्हिजन घेऊन मी निवडणूक लढत आहे. मतदार संघातील आरोग्याचा व रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासोबाबत पर्यटनाच्या माध्यमातून सावंतवाडी मतदारसंघाचा विकास हे स्वप्न उराशी बाळगून माझा पुढील प्रवास सुरू आहे. मी बोलण्यापेक्षा काम करणारा माणूस म्हणून परिचित आहे. त्या दृष्टीने येथील जनतेला दिलेला शब्द पाळणार आहे. त्यामुळे या लढाईत येथील जनतेने माझ्यासोबत राहावे आणि शेगडी या बटनावर आपले अमूल्य मत देऊन मला एकदा संधी द्यावी, असे त्यांनी आवाहन केले आहे.