अवी सामंत ; दोन दिवसात उमेदवार जाहीर करणार…
मालवण, ता. ३० :शासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी पर्यटन व्यावसायिकांना उपेक्षित ठेवले. गेल्या पाच वर्षात पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. त्यामुळे समृद्ध कोकण व कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे येत्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदार संघातून पर्यटन व्यवसायाशी निगडित उमेदवार उभा केला जाणार आहे अशी माहिती कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अवी सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील हॉटेल कोणार्क येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सहदेव साळगावकर, शिवा माडये, बाळू वायंगणकर, मिलिंद झाड, गौरी सातार्डेकर, प्रदीप गावकर, महेश चोपडेकर आदी व्यावसायिक उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या पर्यटन व्यवसायात तारकर्ली व देवबाग या गावांचे योगदान महत्त्वाचे आहे. मात्र पर्यटन विकास महामंडळाकडून तारकर्ली, देवबागमधील पर्यटन व्यावसायिकांवर सातत्याने अन्याय करण्याचे काम होत आहे. निवास न्याहारी योजनेचे अनेक प्रस्ताव पर्यटन विकास महामंडळाकडे प्रलंबित आहेत. तारकर्ली, देवबागमधील निवास न्याहारी पर्यटन विकास महामंडळाशी संलग्न आहेत. पर्यटन केंद्रातील निवासाची व्यवस्था फुल्ल झाल्यानंतर त्यांनी ते ग्राहक या निवास न्याहारी धारकांकडे पाठवायला हवेत. मात्र असे कोणतेही पर्यटक त्यांच्याकडून पाठविले गेले नाहीत. पर्यटन विकास महामंडळ आमच्याकडून पाच हजार रुपये का घेते असा प्रश्नही यावेळी श्री.सामंत यांनी उपस्थित केला.
पर्यटन दिनाच्या कार्यक्रमाचे शुल्कही पर्यटन विकास महामंडळ जर घेत असेल तर त्यांच्याकडून सहकार्याची कोणती अपेक्षा करायची? सत्ताधार्यांनाही गेल्या पाच वर्षाच्या काळात पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे.
पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांची जाण असलेल्या व्यक्तीची आवश्यकता आहे. यादृष्टीकोनातूनच समृद्ध कोकण व कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघाच्यावतीने येत्या निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदार संघातून उमेदवार उभा केला जाणार आहे. येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर केला जाईल. हा उमेदवार पर्यटन व्यवसायाशी निगडितच असेल असेही श्री. सामंत यांनी सांगितले.