निलेश चमणकर; वेंगुर्ले-उभादांडा येथे अभिनय व नृत्य अकादमीचा उत्साहात शुभारंभ….
वेंगुर्ले,ता.०३: एखाद्या कलाकारास त्याचे विचार जगासमोर आणायचे असतील तर कलेच्या विविध माध्यमातून तो आणता येतो. अभिनय, नृत्य, नाट्यकला अश्या माध्यमातून रेखाटलेली कला वा मांडलेला अविष्कार हा पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येतो. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन साठी जगाच्या नकाशावर झळकविण्यासाठी स्थानिक लोककला ही अभिनय व नृत्याच्या माध्यमातून बाहेर आली पाहिजे, असे प्रतिपादन सरपंच निलेश चमणकर यांनी केले. वेंगुर्ले उभादांडा येथे विद्याधर अकादमीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
उभादांडा येथे दिपप्रज्वलन करून या अकादमीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी वेंगुर्ले शहर व उभादांडा पंचक्रोशीतील जास्तीत जास्त मुलांनी आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी या अकादमीचा उपयोग करून घ्यावा, तसेच मुलांच्या संस्काराना योग्य वळणं देण्यासाठी, त्यांच्या तील आत्मविश्वास जागृत करण्यासाठी या अकादमीत प्रवेश घ्यावा. असे आवाहन करून भविष्यात या अकादमीच्या माध्यमातून पदवी, पदवीका अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. गराजलो रे गराजलो या चळवळीचे पुरस्कर्ते व नाट्य दिग्दर्शक सहदेव धर्णे यांनी अकादमीचा उद्देश उपस्थितांना सांगितला. यावेळी डॉ. सई लिंगवत, डॉ. सुप्रिया रावळ, नृत्य शिक्षक गुरूनाथ धर्णे, नाट्य अभिनेते कृष्णा कदम, नाट्य अभिनेती कांचन धर्णे,ओमकार धर्णे, पार्वती धर्णे, शरद कलंगुटकर, साजे परब , सागर धर्णे, ऋतुजा नार्वेकर, सायली कलंगुटकर, रुपेश नार्वेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सहदेव धर्णे यांनी तर आभारप्रदर्शन गुरूनाथ धर्णे यांनी केले.