Monday, April 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याअतिवृष्टी, पुरपरिस्थितिमुळे जिल्ह्यातील ३० हजार शेतकरी बाधित...

अतिवृष्टी, पुरपरिस्थितिमुळे जिल्ह्यातील ३० हजार शेतकरी बाधित…

शासनाला अहवाल सादर;१६ कोटी ५९ लाख रुपयांची आर्थिक नुकसानी…

सिंधुदुर्गनगरी ता. ३०:

जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितिमुळे जिल्ह्यात नुकसान झालेल्या कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक पिकांचे पंचनामे पूर्ण करून त्याचा आहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान कोरडवाहूचे (शेती पिक) झाले असून तिन्ही प्रकारात 7 हजार 398 हेक्टर 21 गुंठे एवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील 29 हजार 933 शेतकरी बाधित झाले असून 16 कोटी 59 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पावसाने मर्यादा ओलांडली. याचा परिणाम नैसर्गिक आपत्तीत होवून त्याचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील शेती-बागायती याला बसला. पाणथळ भागातील भातशेती जाग्यावरच कुसली. सुमारे महिनाभर शेतीत पाणी राहिल्याने या नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे जिल्ह्यातील शेती-बागायती यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, तसेच कृषि समिती सभेत जोरदार करण्यात आली होती. याची दखल घेत शासनाने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य कृषि विभागाला दिले होते. त्यानुसार कृषि विभागाने पंचनामे करून त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविला आहे.

या नुकसानीमध्ये कोरडवाहू शेतीत मोडणाऱ्या भात, नागली, भुईमुग, कडधान्य या पिकांचा समावेश आहे. सिंचनाखालील बागायती पिकांमधील नारळ, सुपारी, ऊस, केळी तसेच बहुवार्षिक पिकाखाली येणाऱ्या आंबा, काजू, आवळा, कोकम या पिकांचेही नुकसान झाले आहे. यावर्षी कोरडवाहू क्षेत्राखालील 54 हजार 762 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी करण्यात आली होती. त्यातील 6 हजार 847 हेक्टर 32 गुंठे क्षेत्रातील 33 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात 23 हजार 456 शेतकरी बाधित झाले आहेत. 13 कोटी 96 लाख 86 हजार एवढे आर्थिक नुकसान झाले आहे. 6 हजार 800 रूपये प्रति हेक्टर नुकसानीसाठी 4 कोटी 65 लाख 63 हजार रूपये तर 13 हजार 600 रूपये प्रति हेक्टर नुकसानीसाठी 9 कोटी 31 लाख 23 हजार रूपये लागणार आहेत.

सिंचनाखालील नारळ, सुपारी, ऊस, केळी या पिकांचे नुकसान झाले आहे. यात 259 हेक्टर 54 गुंठे एवढ्या क्षेत्राचे 33 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यामुळे 1190 शेतकरी बाधित झाले आहेत. याची 10 कोटी 5 लाख 11 हजार एवढे आर्थिक नुकसान झाले आहे. 13 हजार 500 रूपये प्रमाणे प्रति हेक्टर नुकसानी 35 हेक्टर 3 गुंठे तर 27 हजार प्रति हेक्टर नुकसानी 70 हेक्टर 8 गुंठे क्षेत्रावर झाली आहे. बहुवार्षिक पिकाखालील आंबा, काजू, आवळा, कोकम या पिकांचेही नुकसान झाले आहे. या पिकाखाली जिल्ह्यात 1 लाख 3 हजार 787 हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील 291 हेक्टर 37 गुंठे क्षेत्राचे 33 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यामुळे 5 हजार 287 शेतकरी बाधित झाले आहेत. 1 कोटी 57 लाख 34 हजार रूपये एवढे एकूण आर्थिक नुकसान झाले आहे. यामध्ये प्रति हेक्टर 18 हजार नुकसानी क्षेत्र 52 हेक्टर 45 गुंठे तर 36 हजार प्रति गुंठे नुकसानी 104 हेक्टर 89 गुंठे एवढी आहे.

नैसर्गिक आपत्तीत 110 हेक्टर जमीन बाधित

या नैसर्गिक आपत्तीत केवळ मनुष्यहाणी, स्थावर मालमत्ता नुकसान व पिकांचे नुकसान झालेले नाही. पुरामुळे जिल्ह्यातील 110 हेक्टर 9 गुंठे जमीन बाधित झाली आहे. यात देवगड, मालवण व वैभववाडी तालुक्यांतील जामीन बाधित झालेली नाही. उर्वरित तीन तालुक्यांत हा फटका बसला आहे. 439 शेतकऱ्यांना याचा दणका बसला आहे. यामुळे 41 लाख 29 हजार रूपये एवढे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचाही अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments