कोकण विकास आघाडी अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांची मागणी…
कणकवली, ता.१० : राज्यातील हजारो नागरिक दररोज आपल्या तक्रारी, गाऱ्हाणी मांडण्यासाठी मंत्रालयात जात असतात. या नागरिकांच्या सोयीसाठी मुंबईत जाणाऱ्या सर्व एस.टी. बसेस मंत्रालयापर्यंत न्याव्यात, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी केले आहे.
श्री.केळुसकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, राज्यभरातून दररोज शेकडो एस.टी. बसेस मुंबईत येतात. मात्र या बसेस मुंबईतील विविध स्थानकांपर्यंत प्रवाशांना सोडतात. तेथून मंत्रालय गाठण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची परवड सुरू हाेते. टॅक्सी, ओला आदी वाहनातून मंत्रालय गाठण्यासाठी भरमसाठ भाडे द्यावे लागते. त्यासाठी मोठा आर्थिक खर्च उचलावा लागतो. मुंबई सेंट्रल स्थानकाच्या पुढील गिरगाव, कुलाबा आदी उपनगरांतील रहिवासी असलेल्यांनाही अशा भाड्यापोटी एसटीच्या तिकिटांपेक्षा अधिक भाडे मोजून प्रवास करावा लागतो.
श्री.केळुसकर यांनी म्हटले की, कर्नाटक, गुजरात, गोवा आदी विविध राज्यांतील राज्य परिवहन महामंडळांनी आपल्या नागरिकांसाठी तेथील मंत्रालयापर्यंत थेट सेवा सुरू केली आहे. त्याच धर्तीवर मुंबई मंत्रालयापर्यंत एस.टी. बसेस सोडणे गरजेचे आहे.