दीडशे किलो वजनाच्या पिशव्या जप्त; २१ हजार ९०० रुपयाचा दंड…
मालवण, ता. ११ : पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली चार फिरत्या पथकांद्वारे शहरातील स्थानिक व्यापारी, फळविक्रेते, फुलविक्रेते, मच्छी विक्रेते, किराणा दुकाने, बेकरी, पानपट्टी स्टॉल अशा बाजारपेठेतील प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या अंदाजे दीडशे किलो एवढ्या वजनाच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करुन २१ हजार ९०० रुपये एवढ्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे संजय पवार , मंदार केळुसकर तसेच कर्मचारी पथकाने ही कारवाई केली.
केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने १ जुलै २०२२ पासून ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या सिंगल युज प्लॅस्टिक पिशवी उत्पादन, आयात, साठवण, विक्री व वापरावर बंदी केली आहे. महाराष्ट्र प्लास्टिक आणि थरमोकॉल अधिसूचना २०१८ नुसार दोषी आढळल्यास दोषी आढळल्यास ५०० रुपये जागेवर दंड व संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपये दंड आकारण्याची तरतुद करण्यात आली आहे. शहरातील सर्व व्यापारी, व्यवसायिक व नागरिकांनी या आदेशाचे पालन करून सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णतः बंद करावा. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरा ऐवजी पर्याय म्हणून कापडी, कागदी किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्यांचा वापर करावा. अशा प्रकारची जनजागृती स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आणि सोशल मीडिया द्वारे मालवण पालिकेमार्फत नियमित करण्यात येते.
शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांनी ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांची माहिती पालिका प्रशासनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.