सावंतवाडी ता.११: येथील गवळीतिठा परिसरातील पाटील टॉवरच्या पार्किंग मध्ये उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. ही घटना काल सकाळी घडली. याबाबत विक्रम सिंह संभाजीराव जगताप (रा. कोलगाव) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ही गाडी जगताप यांचे मित्र युवराज कुंभार (रा. शिरवडे- कराड) यांची आहे. जगताप यांनी पाटील टॉवरच्या पार्किंग मध्ये सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आपली दुचाकी पार्क करून ठेवली होती. काही तासाने ते मोटर सायकल नेण्यासाठी आले असता त्यांना आपली गाडी पार्किंग मध्ये आढळून आली नाही. यावेळी त्यांनी आजूबाजूला शोधाशोध केली. मात्र गाडी आढळून आली नाही. याबाबत त्यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती ठाणे अंमलदार ज्योती दुधवडकर यांनी दिली.