विष्णू मोंडकरांची जलतरण संघटनेच्या उपाध्यक्ष बाबा परबांकडे निवेदनाद्वारे मागणी…
मालवण, ता. ११ : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चिवला बीच येथे २१, २२ डिसेंबर आयोजित राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांना प्रवेश शुल्कात सवलत मिळावी यासाठी भाजपचे शहराध्यक्ष विष्णू मोंडकर यांच्या वतीने जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष बाबा परब यांना निवेदन देण्यात आले.
चिवला बीच येथे होणाऱ्या या जलतरण स्पर्धेत राज्यासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धक सहभागी होत असतात. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे जिल्ह्यातील स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी होणे शक्य होत नसल्याने मालवण भाजपच्या वतीने बाबा परब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पंकज सादये, ललित चव्हाण, कॅलिस फर्नांडिस उपस्थित होते.
यावेळी बाबा परब यांनी भाजपच्या विनंतीनुसार तालुक्यातील स्पर्धकांना प्रवेश शुल्कात सवलत देण्यात येत असल्याचे सांगितले. या स्पर्धेसाठी यापूर्वी दोन हजार रुपये प्रवेश शुल्क होते. यावर्षी प्रवेश शुल्क अडीज हजार रुपये आहे. मात्र तालुक्यातील स्पर्धकांना या प्रवेश शुल्कात सवलत देण्यात येत असून या स्पर्धकांकडून स्पर्धेसाठी १ हजार प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. तरी स्पर्धकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अर्ज भरावा असे आवाहन श्री. मोंडकर, श्री. परब यांनी केले आहे. स्पर्धेत आतापर्यंत ८ राज्य, २७ जिल्ह्यातील १,२०० स्पर्धक तर १ आंतरराष्ट्रीय स्पर्धकाने सहभाग नोंदवला आहे, अशी माहिती श्री. परब यांनी दिली.