सदाशिव पांचाळ; करंजे हायस्कूल येथे विनामूल्य मार्गदर्शन
वैभववाडी.ता,१: विचार आणि कृती सकारात्मक असेल तर यशाला गवसणी घालणे सहज आणि सोपे होईल. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध माईंड ट्रेनर व मोटीव्हेशनल स्पिकर सदाशिव पांचाळ यांनी केले.
तांबे एज्युकेशन सोसायटी संचलित करंजे, नागवेकर, साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालय, करंजे येथे आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सदाशिव पांचाळ यांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सदाशिव पांचाळ बोलत होते. यावेळी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक गंगाराम परब, शिक्षिका नेहा राणे उपस्थित होते.
विचारांचा जन्म कसा होतो, तो विचार आपल्या आयुष्यात कसे परिणाम करतो, पालकांनी किंवा शिक्षकांनी बोललेले एखादे वाक्य कसे विद्यार्थ्यांमध्ये कशी ऊर्जा निर्माण करते, तोच विचार नकारात्मक असल्यास विद्यार्थ्यांचे आयुष्य कसे डबघाईस येऊ शकते, या सगळ्या विषयी विस्तृतपणे मांडताना पांचाळ यांनी अनेक उदाहरणे सादर केली.
सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार यांच्यातील फरक स्पष्ट केला. दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात हसत खेळत सदाशिव पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना अक्षरक्ष: खिळवून ठेवलेच, पण उपस्थित शिक्षकांनाही जागेवरून हलू दिले नाही. स्मरणशक्ती व मॅजिक मॅथ्स ची प्रात्यक्षिके सर्वांना थक्क करणारी होती.
माईंड ट्रेनर व मोटीव्हेशनल स्पिकर सदाशिव पांचाळ यांचा हा उपक्रम प्रत्येक शाळा महाविद्यालये यांनी तर राबवलाच पाहीजे, त्याच बरोबर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांनी या कार्यक्रमाचे आयोजन करायला हवे, त्यामुळे मुलांवर लहानपणापासूनच संस्कार होतील, असे मत सहाय्यक शिक्षक गंगाराम परब यांनी व्यक्त केले.
_विनामूल्य मार्गदर्शन_
कणकवली तालुक्यातील तळेरे येथे राहणारे माईंड ट्रेनर व मोटीव्हेशनल स्पिकर सदाशिव पांचाळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत हा संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य सादर केला. सदाशिव पांचाळ यांचा हा ७८१ वा कार्यक्रम होता. आतापर्यंत पांचाळ यांचे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव ( कर्नाटक) तसेच गोवा येथे मिळून त्यांचे ७८० कार्यक्रम संपन्न झाले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक गंगाराम परब यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षिका नेहा राणे यांनी केले. या कार्यक्रमात सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
फोटो……
करंजे येथील आदर्श विद्यालयात आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माईंड ट्रेनर व मोटीव्हेशनल स्पिकर सदाशिव पांचाळ.