समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे मागणी…
सावंतवाडी,ता.१३: परभणी येथील जिल्हा कार्यालयाजवळ असलेल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची काही समाजकंटकांकडून तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. या घटनेचा सावंतवाडीतील आंबेडकर अनुयायाच्या वतीने निषेध करण्यात आला व तसेच अशा विकृत प्रकृतींवर देशद्रोहांचा गुन्हा दाखल करावा, असे आवाहन प्रांत अधिकारी हेमंत निकम यांना निवेदनाद्वारे करण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, सावंतवाडी सारख्या शांत शहरात अशा घटना घडू नये व शांतता अबाधित राहण्यासाठी आंबेडकर अनुयायांसह भारतीय संविधान प्रेमींनी या घटनेचा तीव्र निषेध करून अशा समाजकंटकाला कठोर शिक्षा करावी व अशा घटना पुन्हा पुन्हा राज्यात घडणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी, असे आवाहन त्यांनी या निवेदनात केले आहे. या निवेदनावर सुमारे १०० संविधान प्रेमींच्या सह्या असून ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी हेमंत निकम यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी रवी जाधव, वासुदेव जाधव, मिलिंद निमळेकर लाडू जाधव, ॲड. सगुण जाधव, भावना कदम, मंगेश जाधव, के. व्ही. जाधव, के. जाधव, सुरेश कारवडेकर इत्यादी आंबेडकर यावेळी उपस्थित होते.