रवी जाधव यांची नाराजी; मुख्याधिकार्यांसह प्रशासकाच्या भूमिकेबाबत नाराजी…
सावंतवाडी,ता.१३: पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात अनेक समस्या वाढल्या आहेत. स्वच्छतेसह आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील मुख्य रस्ते खड्डेमय झाले आहेत. परंतू पालिकेचे मुख्याधिकारी सुशेगाद आहेत, असा आरोप सामाजिक बांधिलकी संस्थेचे सदस्य रवी जाधव यांनी केला आहे. दरम्यान पालिकेवर प्रशासक बसल्यानंतर विकास अजूनही ठप्प झाला आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना महत्वाच्या कामांसोबत कागदपत्रासाठी वाट पहावी लागत आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाने योग्य ती भूमिका घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत श्री. जाधव यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, कित्येक लोकांच्या तक्रारी आहेत. मुख्याधिकाऱ्यांकडे एखादी समस्या घेऊन गेल्यावर त्यांच म्हणणं ऐकून न घेता उद्धटपणे उत्तरे दिली जातात अशा या अधिकाऱ्यांना विचारणार कोणी नसल्याकारणाने मनमानी कारभार सुरू आहे. प्रत्येक अधिकारी किंवा कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत जनतेच्या सेवेचा त्यांना पगार दिला जातो. परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीं या स्वतःचा वेळ व पैसा खर्च करून नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याचे काम, रस्त्यावर पडलेली झाडे हटवणे स्वच्छता अभियान राबवणे तर कित्येक वेळा पालिका क्षेत्रात अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेऊन त्यांचा जीव वाचवणे अशा प्रकारची कामे करतात. परंतु या गोष्टीची या अधिकाऱ्यांकडून दखल घेणे सोडाच उलट सदर कामाचा त्यांना कमीपणा वाटतो त्यामुळे ते सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दुय्यम वागणूक देतात. याचाही अनुभव सामाजिक क्षेत्रातील लोकांनी घेतला आहे. शहरामध्ये सांस्कृतिक उपक्रम राबवायचे झाले तर मुख्याधिकारी जरासुद्धा सहकार्य करत नाही. याचाही अनुभव काहींनी घेतलेला आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच हे वागणं शहरातील जनतेच्या सोयी सुविधांसाठी मारक आहे, अशी भीती रवी जाधव यांनी व्यक्त केली आहे.



