मालवण, ता. १४ : येथील पंचायत समिती, शिक्षण विभाग आणि मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती, मुंबई संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १७ ते १८ डिसेंबर या कालावधीत ओझर विद्यामंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनासाठी शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा विषय ठेवण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन १७ डिसेंबरला सकाळी १० वाजता आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास तहसीलदार वर्षा झालटे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी कविता शिंपी, तालुका उत्तर विभाग शिक्षण सहायक समितीचे अध्यक्ष शेखर राणे, सचिव जी. एस. परब, ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, गटशिक्षणाधिकारी संजय माने, शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे आदी उपस्थित राहणार आहेत.
१७ रोजी सकाळी ११ वाजता निबंध स्पर्धा, २ वाजता वक्तृत्व स्पर्धा, २ ते ५.३० यावेळेत विज्ञान प्रतिकृती, शैक्षणिक साहित्य, प्रायोगिक साधने परीक्षण, १८ ला सकाळी १० वाजता प्रश्नमंजुषा स्पर्धा, २ वाजता पारितोषिक वितरण समारंभ, समारोप होईल.
पारितोषिक वितरण समारंभास मथुरे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. दीपक परब, बांधकाम व्यावसायिक मंगेश सुर्वे माजी मुख्याध्यापिका यु. डी. मुरवणे, गटशिक्षणाधिकारी संजय माने आदी उपस्थित राहणार आहेत.
या विज्ञान प्रदर्शनास कांदळगाव, हडी, रेवंडी, कोळंब-कातवड, तोंडवळी-तळाशिल पंचक्रोशी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, ओझर विद्यामंदिर कांदळगाव शालेय समिती व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटना, विज्ञान मंडळ, मुख्याध्यापक संघ, सर्व विस्तारअधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.