सावंतवाडी,ता.१४: तालुक्यात ठिकठिकाणी दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या नामघोषात सावंतवाडी दुमदुमून गेली होती. शहरातून प्रतिवर्षाप्रमाणे दत्त पालखी मिरवणूक काढण्यात आली. सकाळपासूनच दत्त दर्शनासाठी मंदीरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी दत्त जन्म उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.
सावंतवाडी शहरातील प.पू. टेंब्ये स्वामी यांच वास्तव्य असलेल्या भटवाडी येथील ऐतिहासिक दत्त मंदीर, सबनीसवाडा येथील एकमुखी दत्त मंदिर, इंदिरा गांधी व्यापारी संकुल, सावंतवाडी आगारासह माजगाव येथील दत्त मंदीर येथे मोठ्या जल्लोषात जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दत्त पूजा, एकादशमी, लघुरुद्र, अभिषेक, नामस्मरण, सुश्राव्य कीर्तन, भजना आदी कार्यक्रम पार पडले. माजगाव येथील दत्त मंदीर पालखी मिरवणूक शहरातून काढण्यात आली. श्रींची आरती, मंत्रपुष्पांजली, तिर्थप्रसाद आदी कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत पार पडले. सायंकाळ नंतर दत्त जयंती उत्सव साजरा झाला. यावेळी दत्त भक्तांनी श्रींचे आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी केली होती.