डॉ.दिलीप पांढरपट्टे;जिल्ह्यात ६ लाख ६९ हजार ६६५ मतदार…
सिंधुदुर्गनगरी ता.०१: जिल्ह्यात कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी असे तीन मतदारसंघ असून जिल्ह्यात ६ लाख ६९ हजार ६६५ मतदार आहेत.विधानसभा निवडणूक २०1९ करिता पूर्वतयारी पूर्ण झाली असून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक व मतदार हे मतदान करतील,असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केला.
निवडणुकीकरिता नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आदर्श आचारसंहिता काळात राजकीय पक्षांनी काय करावे व काय करू नये याबाबत कळविण्यात आले आहे. निवडणूक काळात केल्या जाणाऱ्या जाहिरातींचे दर प्रकाशित करण्यात आले आहे. दिव्यांग मतदारांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून एकही दिव्यांग व्यक्ती मतदानापासून वंचित राहणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचेही डॉ.पांढरपट्टे यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्त्री मतदारांची संख्या जास्त असून स्त्री मतदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सखी मतदान केंद्र प्रत्येक मतदारसंघात असणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येत असून यात सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे. विशेषत: नवमतदारांनी मतदार नोंदणी करावी आणि मतदान करावे यासाठी महाविद्यालयामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी महाविद्यालय स्तरावर “इलेक्ट्रोल लिटरसी क्लब” निर्माण करण्यात आला आहे. लोककला, चित्रकथी, , दशावतार, विद्यार्थी रॅली, बिच रॅली, वाळू शिल्प या माध्यमातून मनोरंजनातून प्रबोधनाचे काम सुरू आहे. ई.व्ही.एम. आणि व्हीव्हीपॅटबाबतची कोणतीशी साशंकता नसावी, याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक-2019 करिता सिंधुदुर्ग जिल्ह्याची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. या जिल्ह्यात प्रत्येक नागरिक व मतदार हा मतदान करेल तसेच ही मतदान प्रक्रिया उत्साहात आणि शांततेत पार पडेल, असा विश्वासही डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केला.