करुळचे सुपुत्र डॉ.सतीश कोलते “एनएसएस”पुरस्काराने सन्मानित…

122
2
Google search engine
Google search engine
Google search engine

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सत्काराचे वितरण…


वैभववाडी ता.०१:

राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरीबद्दल तालुक्यातील करुळ गावचे सुपुत्र प्रा.डॉ. सतीश कोलते यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते एनएसएस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांना मिळालेल्या पुरस्कारबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
डॉ. सतिश कोलते हे मुंबई येथील किशनचंद चेल्लाराम (केसी) महाविद्यालयात गेली अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने एनएसएस दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती भवनात एनएसएस पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात महाराष्ट्राला एनएसएस चे दोन पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कार वितरणप्रसंगी राज्यमंत्री किरण रिजिजू आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या श्रेणीमध्ये देशातील एकुण १० महाविद्यालयांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून के. सी. महाविद्यालयाला यावेळी सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्य हेमलता बागला यांना चषक व एक लाख रुपयांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर याच महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सतीश कोलते यांना ७० हजार रुपये रजतपदक व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
डॉ. कोलते यांनी मुंबई विद्यापीठांतर्गत एनएसएस मध्ये गेली १५ वर्ष केलेले काम उल्लेखनीय आहे. सन २०११, सन २०१५ व सन २०१९ मध्ये मुंबई विद्यापीठाने त्यांना बेस्ट ऑफिसर पुरस्काराने सन्मानित केले होते. उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांनी सुध्दा त्यांच्या कामगिरीची दखल घेत इंदिरा गांधी पुरस्काराने गौरविले होते.
ग्रामीण व आदिवासी भागात डॉ. सतिश कोलते यांनी एनएसएस च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल शासनाने घेवून त्यांना पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल शिक्षण प्रेमीमध्ये डॉ. कोलते यांचे अभिनंदन केले जात आहे.

\