आम्ही शिवसेनेशी ‘फडफड’ करणार नाही!…

93
2
Google search engine
Google search engine
Google search engine

भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांची भूमिका ; जनसंपर्क अभियानातून भाजपची ताकद दाखवून देणार…

मालवण, ता. १ : भाजप-शिवसेनेची सत्ता असल्याने कुडाळ-मालवण मतदारसंघात भरघोस निधी देण्यात आला. मात्र गेल्या पाच वर्षात मित्रपक्ष शिवसेनेकडून भाजपला प्रत्येक कार्यक्रमात डावलण्यात आले. लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे शिवसेनेला साथ दिली. मात्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत आम्ही ‘फडफड’ करणार नाही, अशी भूमिका भाजप तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी मांडली.
दरम्यान आमदार भाजपला नगण्य समजत असल्याने ३ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत जनसंपर्क अभियान राबवून मतदार संघातील भाजपची ताकद दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
तालुका भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी शहराध्यक्ष बबलू राऊत, गणेश कुशे आदी उपस्थित होते. भाजपच्या तालुका पदाधिकार्‍यांची महत्त्वाची बैठक आज झाली. या बैठकीस विलास हडकर, बाबा मोंडकर, भाऊ सामंत, महेश मांजरेकर यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यात शिवसेना कोणत्याही निर्णय प्रक्रियेत आम्हाला विश्‍वासात घेत नाही. ते केवळ निवडणुकीत आम्हाला गृहित धरत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांचे प्रामाणिक काम करूनही त्यांनी दिलेली आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत. मुख्यमंत्र्यांनी ग्रामसडक योजनेतंर्गतच्या कामांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. मात्र या कामांच्या कार्यक्रमांना भाजपच्या पदाधिकार्‍यांना डावलण्याचे काम आमदारांनी केले. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश मानून काम केले. शिवसेनेने सातत्याने आमच्यावर टीका करायची आणि आम्ही पक्षशिस्त म्हणून त्यांचे काम करायचे हे किती दिवस चालणार असा प्रश्‍न उपस्थित करत या विधानसभा निवडणुकीत आमदारांचा कोणत्याही परिस्थितीत प्रचार करणार नसल्याची भूमीका पदाधिकार्‍यांनी या बैठकीत मांडल्याचे श्री. केनवडेकर यांनी स्पष्ट केले.
आमदार प्रसाद लाड यांनी मंजूर करून दिलेली डोंगरी विभागातील कामे काढून टाकण्याचे काम आमदार नाईकांनी केले. भाजपच्यावतीने सुचविलेली कामे जाणूनबूजून डावलण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा रोष आहे. भाजप नगण्य असल्याचे आमदार सांगत असल्याने येत्या काही दिवसात भाजपच्यावतीने संपर्क अभियान राबवून ताकद दाखवून देऊ असे केनवडेकर यांनी सांगितले.
भाजप म्हणून शहर विकास आराखड्याबाबत सर्वसामान्यांच्या ज्या तक्रारी होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुरूस्त केलेला आराखड्यात बदल करण्याचे काम मित्रपक्ष शिवसेनेने केले की काय अशी शंका आता निर्माण होत आहे. भाजपला श्रेय मिळेल म्हणूनच त्यांनी नळपाणी योजना जीवन प्राधीकरणकडे देण्याचे काम त्यांनी केल्याचा आरोपही श्री. केनवडेकर यांनी यावेळी केला.

\