
कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक रिंगणात ; ४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार…
मालवण, ता. १ : स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत हे कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळाली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरत आहेत. येत्या ४ तारखेला हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत श्री. सामंत हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ-मालवणच्या राणेसमर्थकांनी आज सायंकाळी जोरदार शक्तीप्रदर्शन करत कुंभारमाठ येथे बैठक घेतली. या बैठकीस दोन्ही तालुक्यातील राणे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत कुडाळ-मालवण मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून देवदत्त सामंत यांच्या नावाचा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. त्यांच्या आग्रहानुसार त्यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांच्या या भावना स्वाभीमानचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांच्यापर्यंत पोचविल्या जाणार असल्याची माहिती स्वाभीमानच्या पदाधिकार्यांनी दिली.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, संध्या तेरसे, नीलिमा सावंत, सभापती सोनाली कोदे, सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, बाबा परब, अशोक बागवे, सुनील घाडीगावकर, राजू परुळेकर, राजा गावडे, मंदार लुडबे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या विधानसभा निवडणुकीत २५ हजाराच्या मताधिक्यांनी निवडून येऊ. गेली ३५ वर्षे कुडाळ मतदार संघात स्थानिक उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे स्थानिक उमेदवार म्हणून या निवडणुकीस सामोरे जाणार आहे. किनारपट्टी भागातील बंधार्याचा प्रश्न तीन महिन्यात सोडविणार अन्यथा तीन महिन्यानंतर आमदारकीचा राजीनामा देऊ असे श्री. सामंत यांनी या बैठकीत स्पष्ट केल्याचे समजते. भाजपचे पदाधिकारी भाऊ सामंत यांनी या निवडणुकीत भाजपनेही आमदार वैभव नाईक यांना कोणतीही मदत न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे या स्पष्ट केल्याचे समजते.



