ग्रामस्थांचा प्रसिद्धीपत्रकाद्वारे आरोप:आता तरी भुरळ घालण्याचे थांबवा
आंबोली ता.०२: आपले दुसरे घर आंबोली आहे,असे सांगून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोलीची वाट लावली.त्यांच्याच दुर्लक्षामुळे आंबोलीतील चौदाशे एकर जमीन वनविभागाच्या ताब्यात गेली. आंबोली सारख्या पर्यटन स्थळावर आजही विकासाची वानवा आहे.असा आरोप करीत केसरकरांनी आता तरी आंबोलीवासियांना भुरळ घालण्याचे थांबवावे,अशी टीका आंबोली ग्रामस्थांनी पत्रकांच्या माध्यमातून केली आहे.
यात उल्हास गावडे, गेळे सरपंच अंकुश कदम,मनोहर बंड,भीमसेन सावंत, शिवा गावडे,प्रकाश गावडे यांनी हे प्रसिद्धी पत्र दिले आहे.यात असे नमुद आहे की आंबोली येथील कबुलायतदार गावकर प्रश्न केवळ राजन तेली व रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे सुटला. केसरकरांनी नाहक श्रेय घेऊ नये.उलट आंबोलीचा विकास करू असे सांगुन केसरकरांनी तोडांला पाने पुसण्याचे काम केले. याठिकाणी आंतरराष्ट्र प्रकल्प, विदेशी पर्यटक आणू अशा वारंवार घोषणा केल्या. रोजगाराचे आश्वासन दिले हे नेमके कुठे आहे याचा शोध आता घ्यावा लागेल असाही टोला या पत्रकात ग्रामस्थांनी लगावला आहे.