संदेश पारकर:उदया शक्ती प्रदर्शन करून भरणार उमेदवारी अर्ज
कणकवली, ता.2 :
गेली तीन वर्षे मी कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी मेहनत घेत आहे. मी कणकवलीतून उभा राहणार असल्याने भाजप जिल्हाध्यक्षांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर आम्ही कणकवलीसाठी पक्षाकडे मुलाखती देखील दिल्या. पण ऐन वेळी कणकवलीतून राणेंना उमेदवारी दिली जात असेल तर ती बाब योग्य नाही. इथल्या जनतेचा राणेंना किती विरोध आहे हे उद्या (ता.3) निश्चितपणे समजून येईल. कार्यकर्त्यांच्या प्रचंड शक्तीप्रदर्शनाने आपण उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याची माहिती भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांनी आज दिली.
येथील आपल्या निवासस्थानी संदेश पारकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री सिंधुदुर्गात आले. पाच तास उशिरा येऊन देखिल इथली जनता त्यांच्यासाठी थांबून राहिली. हा जनतेचा प्रचंड पाठिंबा पाहून राणेंनी धसका घेतला. कमळ निशाणी घेतल्याखेरीज विजय मिळवता येणार नाही हे देखील त्यांच्या लक्षात आले. त्या दिवसापासूनच ते आपला भाजपमध्ये प्रवेश होईल असे सांगत फिरत आहेत. पण त्यांना भाजप पक्षात घेतले जाणार नाही असा मला ठाम विश्वास आहे.
पारकर म्हणाले, राणेंचा जनाधार केव्हाच संपला आहे. आता ते सिंधुदुर्गचे नेते राहिले नाहीत तर कणकवली पुरतेच मर्यादीत झाले आहेत. या विधानसभा निवडणुकीत त्यांचे कणकवलीमधील अस्तित्व देखील संपुष्टात आले होते. एवढी ताकद भाजप पक्षाने सिंधुदुर्गात निर्माण केली आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण,आमदार प्रसाद लाड, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यासह आपण या मतदारसंघात भाजप उभारणीसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे स्वबळावर देखील भाजपची जागा निवडून येऊ शकते. अशी परिस्थिती असताना भाजप पक्ष जर राणेंना कणकवलीची उमेदवारी देत असेल तर ते चुकीचे आहे.
ते म्हणाले, कणकवलीत भाजपचा उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाही. भाजपचा एबी फॉर्म मला मिळेल असाही विश्वास आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरताना आपल्या पाठीशी कार्यकर्त्यांची ताकद किती आहे हे देखील समजून येईल असे श्री.पारकर म्हणाले.