बांदा,ता.०५: मडुरा-मोरकेवाडी येथील सार्वजनिक विहीरीत बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. भक्षाच्या शोधात असताना तो विहीरीत कोसळला असावा, असा वनविभागाचा अंदाज आहे. ही घटना आज सकाळी उघड झाली. त्यानंतर वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या बिबट्याचा मृतदेह नष्ट करण्यात आला.
मडूरा-मोरकेवाडी येथील गवंडी कुटुंबीयांच्या सार्वजनिक विहिरीत आज पहाटे ग्रामस्थ नामदेव गवंडी यांना बिबट्या मृत अवस्थेत तरंगताना आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती सावंतवाडी वनविभागाला दिल्यानंतर वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील, नेहा वानरे, वनपाल प्रमोद राणे यांच्यासह वन कर्मचारी व जलद कृती दलाचे कर्मचारी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने मृत बिबट्या विहिरीतून बाहेर काढण्यात आला.