Monday, January 13, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावैभववाडी-शिराळे गावची गावपळण सुरु...

वैभववाडी-शिराळे गावची गावपळण सुरु…

वैभववाडी,ता.०८: शिराळे गावच्या पारंपरिक गावपळनीला आज दुपारनंतर सुरुवात झाली आहे. शिराळेवाशीय आपली गुरे ढोरे, कोंबड्या, कुत्र्यासह गावच्या सीमेच्या बाहेर सडूरे गावच्या हद्दीत नैसर्गिक अधिवासात दडोबाच्या पायथ्याशी बांधलेल्या राहुट्यात आपला संसार थाटाला आहे. पुढचे काही दिवस वास्तव्य करणार असून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुसह अबालावृद्ध कडक्याच्या थंडीत गावपळणीत सहभागी झाले आहेत.

या गावपळणीला सुमारे ४५० वर्षां पेक्षा जास्त वर्षाची परंपरा असल्याचे गावातील जानकर वयोवृद्धांकडून सांगितले. या गावपळणी मागे काही अख्यायिका सांगितल्या जातात.  वैभववाडीपासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर सह्याद्रीच्या कुशित वसलेले शिराळे हे स्वतंत्र महसूली गाव आहे. गावात हिंदू मराठा व धनगर समाजाची सुमारे ८० कुटुंबे असून ३५० लोकसंख्या असलेले हे छोटेसे गाव आहे.  दरवर्षी षौष महिन्याच्या सुरुवातीला शिराळे गावची गावपळण होते.  गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वराने कौल दिल्यानंतर बुधवारी दुपारनंतर शिराळेवासियांनी गाव सोडले आहे. सडुरे गावच्या हद्दीत माळरानावर  ४० राहुट्या उभारुन या राहुट्यांमध्ये संसार थाटला आहे. राहुट्यांसमोरच गुरे बांधण्यासाठी गाताडी बांधल्या आहेत.

ज्या दिवशी घरातून बाहेर पडतात तो दिवस गृहित धरला जात नाही. गावपळणीनंतर पहीले तीन दिवस कोणीही ग्रामस्थ गावाकडे फिरत नाही.गावपळणी दरम्यान गावची प्राथमिक शाळाही राहुट्यानजीक असलेल्या आंब्याच्या झाडाखाली भरविली जाते.एस.टी.बस थांबाही तिथेच होतो. गावपळणी दरम्यान लगतच असलेल्या शुकनदी पाञातील झ-यातील पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरतात.

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रगतीसाठी जो तो शहराकडे धावत आहे. त्यामुळे माणसाचे निसर्गाशी असलेले नाते दिवसेंदिवस तुटत आहे.गावपळणीच्या मागे काहीही कारण असो परंतु त्यानिमित्ताने शिराळेवासीय गावपळणी दरम्यान निर्सगाच्या सानिध्यात एकञ कुटुंब पध्दतीने राहात आहेत. टी.व्ही. मोबाईलच्या दुनियेत हरवलेला थेट संवाद या गावपळणी दरम्यान ग्रामस्थांमध्ये पहायला मिळत आहे. दिवसभर ग्रामस्थ  गप्पा गोष्टी करतात, मुले मनसोक्त खेळतात बागडत, तर राञी भजन करत आनंद घेत आहेत. तीन दिवसानंतर परत ग्रामदैवताला कौल लावून गांगेश्वराला कौल लावून हुकूम घेतला जाणार आहे. देवाने हुकुम दिल्यानंतर पाच किंवा सात दिवासाने परत गावात जातील.ज्या दिवशी शिराळे वाशीय परत गावात जातात. त्या दिवशी रात्री घोरीप हा पारंपरिक उत्सव केला जातो. हा उत्सवात सहभागी होण्यासाठी त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आवर्जून हजेरी लावतात. उपस्थितांना महाप्रसाद दिला जातो. दरवर्षी गावपळण होणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिराळे हे एकमेव गाव आहे. दरवर्षी होणारी ही गावपळण ग्रामस्थ देवाचे वार्षिक म्हणून मोठ्या श्रध्देने या गावपळणीत सहभागी होतात. या गावपळणीचा आनंद घेण्यासाठी चाकरमानीही गावात दाखल झाले आहेत.

 

चौकट-

 

गेले चार पाच दिवस तालुक्यात कडाक्याची थंडी पडत आहे. तालुक्यातील तापमान १० अंशा पर्यंत खाली आले आहे. अशा कडाक्याच्या थंडीतही गावपळणीत गावातील अबालवृध्द मोठ्या श्रध्देने सहभागी झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments