नितेश राणे ; कणकवली पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ…
कणकवली, ता. १० : केवळ आमदार असताना कणकवली शहरात आम्ही पोदार इंटरनॅशनल स्कुल, जाणवली नदीवरील पूल, रेल्वे स्टेशन सुशोभीकरण, सुसज्ज उद्यान, स्पोर्ट कॉम्लेक्स आणि रिंगरोडचे जाळे निर्माण करू शकलो. आता तर कॅबिनेट मंत्री आहोत. त्यामुळे पुढील पाच वर्षात कणकवली शहरात विकासाची प्रक्रिया आणखी गतिमान झालेली दिसेल. शहराच्या कुठल्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी दिली.
जिल्हा भाजप आयोजित कणकवली पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांनी केले. येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या पटांगणावर झालेल्या या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगरसेवक संजय कामतेकर, अभि मुसळे, विराज भोसले, बाबू गायकवाड, शिशिर परुळेकर,माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे, मेघा गांगण , कविता राणे, प्रतीक्षा सावंत, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, प्राची कर्पे आदी उपस्थित होते.
श्री.राणे म्हणाले, लवकरच राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका लागतील. त्यावेळी कणकवली शहरातील तेव्हा विरोधक जागे होतील. पण आम्ही कणकवली करांच्या सेवेत कायम होतो आणि असणार आहोत असा विश्वास प्रत्येक शहरवासीयांमध्ये आहे. केंद्रात राज्यात सत्ता आपली आहे. खासदार आपले राणे साहेब आहेत. मी स्वतः कॅबिनेट मंत्री आहे. सिंधुदुर्ग वर प्रेम करणारे आपले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कणकवली शहराच्या न भूतो अशा विकासासाठी निधीची कमतरता कधीच भासणार नाही.
श्री.राणे पुढे म्हणाले, सिंधुदुर्गात पर्यटन महोत्सव आणि त्यातून जिल्हा पर्यटनाला आणि आर्थिक उलढालीला चालना देणे याची सुरुवात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. राणे कुटुंबाची कणकवली शहरामुळे ओळख आहे. त्यामुळे कणकवली चे नाव राज्यात आणि देशात उंचावण्याची जबाबदारी आमची आहे. पर्यटन कणकवली पर्यटन महोत्सवच्या माध्यमातून टीव्हीवर दिसणारे देशातील दिग्गज कलाकार प्रत्यक्ष पाहण्याची, त्यांची कला प्रत्यक्ष पाहण्याची संधी जनतेला मिळते. कणकवली पर्यटन महोत्सव आता ब्रँड तयार झाला आहे. कणकवली नगरपंचायतची सत्ता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मागताना कणकवली शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा शब्द दिला होता. तो शब्द आज आम्ही पाळला आहे याची प्रचिती कणकवली शहर फिरताना जनतेला येत आहे. आता मीच मंत्री झाल्यामुळे कणकवली च्या विकासाच्या केवळ नियोजन आराखडा बनवा लागेल तो निधी देण्याची जबाबदारी माझी आहे.
समीर नलावडे म्हणाले की, सन २००८ साली जेव्हा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली नगरपंचायत ची सत्ता जनतेने आम्हाला दिली. तेव्हा राणेसाहेबांनी कणकवली शहरात पर्यटन महोत्सव व्हायला पाहिजे. तेव्हापासून सत्ता असो अथवा नसो पर्यटन महोत्सव चे आयोजन आम्ही करत आहोत. या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून कणकवली शहरातील स्थानिकांना रोजगार मिळत आहे. केवळ आमदार असताना नितेश राणे यांनी कणकवली शहराचा कायापालट मागील पाच वर्षात केला आहे. आता नितेश साहेब कॅबिनेट मंत्री आहेत. आता कणकवली शहराचा अश्वगतीने विकास होईल. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. आभार प्रदर्शन बंडू हर्णे यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्षा कै. सायली मालंडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.