बांदा,ता.१०: पोलीस कर्मचारी व पत्रकार यांच्यातील क्रिकेट सामन्यात पत्रकार संघाचे विजय पटकावला. पोलीस संघाने दिलेले आव्हान पार करीत पत्रकार संघाने सामना सहजरीतीने जिंकला. शेर्ला-आरोसबाग येथील मैदानावर हा सामना संपन्न झाला.
पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी सामन्याची नाणेफेक केली. पोलीस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पोलीस संघाने निर्धारित ८ षटकात ६ गडी गमावून ५५ धावा जमविल्या. सिद्धेश माळकर यांनी ३ षटकार व चौकरासह २६ धावांचे योगदान दिले. प्रवीण परब यांनी २ षटकात ६ धावा देत ४ गडी बाद केले. तर अक्षय मयेकर, शैलेश गवस यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला. ५६ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या पत्रकार संघाने शेवटच्या षटकात विजय संपादन केला. राजाराम धुरी यांनी दोन षटकार व दोन चौकारासह २१ धावांचे योगदान दिले. विराज परब, अक्षय मयेकर, प्रवीण परब, शैलेश गवस, जय भोसले यांनीही फलंदाजीत योगदान दिले. यावेळी आशुतोष भांगले, निलेश मोरजकर, यश माधव संघात सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.