सावंतवाडी,ता.१०: झाराप झिरो पॉईंट येथे दोन दुचाकीत समोरासमोर झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. साद शेख (वय २३, रा. तेरसेबांबर्डे), सहमत अली (वय २३) व राबूल अन्सारी (वय २४, रा. बिहार, सध्या रा. आकेरी) अशी त्यांची नावे आहेत.
दोन्ही युवकांची मोटरसायकल एकमेकांना धडकल्याने हा अपघात घडला. या अपघातानंतर झाराप येथील सरपंच राजू तेंडुलकर व राष्ट्रवादीचे पदाधिकारी संदीप राणे यांनी त्या अपघातग्रस्त तिन्ही युवकांना आपल्या गाडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अधिक उपचार सुरू आहेत. यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर व रवी जाधव यांच्याकडून अपघात ग्रस्त युवकांना योग्य ते सहकार्य करण्यात आले.