वेंगुर्ले ता.०३:
तालुक्यातील वेतोरे मिरमेवाडी येथील शेतकरी नितीन मधुकर गावडे गवारेड्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.वेतोरे येथील नितीन गावडे हे ढवाळसे येथील शेतमांगरातून गुरुवारी सकाळी साडेसात वाजता मोटर सायकल वरून गाई-म्हशींचे दूध घेऊन दूध डेरी वर जात होते. त्याच दरम्यान वेतोरेतीठा नजीक कृष्णा चीचकर यांच्या घरासमोर गवारेड्याने अचानक गावडे यांच्यावर हल्ला केला.
त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांच्या आरडाओरडी मुळे गावडे किरकोळ जखमी होत बालंबाल वाचले. यावेळी ग्रामस्थ आबा साळगावकर,भगवान म्हापणकर, वैभव धुरी, कृष्णा चिचकर, प्रकाश अणसुरकर, गजानन धुरी, तुषार चीचकर, गुरुनाथ वराडकर यांनी धाव घेत गावडे यांची सुटका केली. तसेच
गावडे यांना तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने कुडाळ येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले. गावडे यांच्या डोक्याला सहा टाके पडले असून मुका मार ही लागला आहे. तर मोटरसायकलचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
वेतोरे पंचक्रोशीत गवेरेडे, बिबटे यांची कायमची दहशत असून भर दिवसा वन्य प्राणी स्थानिक ग्रामस्थांवर हल्ला करत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .वन विभागाने या वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी वेतोरे वासीयांमधून होत आहे.