कणकवली, ता.१५ : परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२१ वा जयंती उत्सव गुरूवार १६ जानेवारी ते २० जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या उत्सवातील सर्व कार्यक्रम प्रसिध्दी फलक व कार्यक्रम पत्रिकेद्वारे जाहीर करण्यात आले आहेत. परंतु कणकवली शहरामध्ये परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे नाव वापरून काही लोकांकडून दीपोत्सव व रिल्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे सर्व कार्यक्रम यापूर्वीच जाहीर झाले असून त्यात कोणत्याही स्पर्धांचा समावेश केलेला नाही.
सदर ग्रुपने परमहंस भालचंद्र महाराज संस्थानची कोणतीही पूर्व परवानगी न घेता संस्थानचे नाव वापरून स्पर्धेचे परस्पर आयोजन केलेले असून त्याला परमहंस भालचंद्र संस्थानची मान्यता घेतलेली नाही ही गंभीर गोष्ट आहे. संस्थानचे सर्व आर्थिक व्यवहार हे स्वच्छ असून अधिकृत पावतीद्वारेच देण्याघेण्याचे व्यवहार केले जातात. विनापावती कोणतेही व्यवहार होत नाहीत. सर्व आर्थिक व्यवहार हे व्यवस्थापक व संस्थेचे लेखनिक यांच्या मार्फतच फक्त होतात. अन्य कोणत्याही व्यक्तींशी केलेल्या आर्थिक व्यवहारास संस्थान जबाबदार असणार नाही याची सर्व भक्तगणांनी नोंद घ्यावी.
पालखी मिरवणुकीमध्ये कोणताही विशिष्ट प्रकारचा ड्रेस घालणे बंधनकारक नसून सर्व भक्तगणांनी उत्स्फुर्तपणे या पालखी मिरवणूकीत सहभागी व्हावे. ‘नमो भालचंद्राय ग्रुप’ हा स्वंतत्रपणे असुन तो परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचा कोणताही घटक नाही. तरी सर्व भक्तगणांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानतर्फे करण्यात येत आहे.