जिल्हाप्रमुख संजय पडते यांची माहिती : बंडखोर तेलींना भाजपने समज द्यावी…
कणकवली, ता.३ :
कणकवली मतदारसंघात राणे यांना उमेदवारी दिली, तर शिवसेना त्यांचे काम करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने आधीच जाहीर केले होते. आज नितेश राणेंचा पक्षात प्रवेश झाला.त्यांना उद्या भाजपचा एबी फॉर्म दिला जाणार आहे. त्यामुळे कणकवली मतदार संघात एकही शिवसैनिक राणेंचे काम करणार नाही असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज जाहीर केले. तसेच सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या विरोधात राजन तेली यांनी बंड केले आहे. भाजपचे झेंडे आणि कार्यकर्ते घेऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी. तसेच भाजपच्या वरिष्ठांनी तेलींना समज द्यावी अशीही मागणी पडते यांनी केली.
श्री. पडते यांनी आज येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना जिल्हा महिला संघटक नीलम सावंत पालव, नगरसेवक सुशांत नाईक, राजू राठोड, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, राजू शेटे, सचिन सावंत, मिलिंद साटम, मंगेश लोके आदी उपस्थित होते.
श्री पडते म्हणाले, राणे कुटुंबाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मोठा त्रास दिला. तसेच शिवसेना पक्ष संपविण्याचा ही विडा उचलला होता. त्यामुळे महायुती असली तरी नितेश राणे यांचे काम कुठलाही शिवसैनिक करणार नाही. नितेश राणे यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल असे आज दुपारपर्यंत निश्चित नव्हते. त्यामुळे कणकवली मतदार संघात शिवसेनेने आपला उमेदवार उभा केला नव्हता. मात्र आज नितेश राणे यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर कणकवली मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी बैठक घेतली. तसेच या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर राणे यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार उभा करण्याचे निश्चित झाले तर शिवसैनिक त्यांचा जीव तोडून प्रचार करतील आणि निवडून देखील आणतील. मात्र याबाबत वरिष्ठांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.
सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी बंडखोरी केली आहे कुडाळ मतदार संघात देखील प्रभाकर सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे राज्यात शिवसेना आणि भाजपची युती आहे. सावंतवाडी आणि कुडाळ या जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या आहेत. त्यामुळे महायुतीचा धर्म म्हणून राजन तेली, प्रभाकर सावंत यांनी आपली उमेदवारी मागे घ्यायला हवी. याबाबत पक्षाने त्यांना समज द्यावी अशी मागणी आम्ही भाजपच्या वरिष्ठांकडे केली असल्याचे संजय पडते म्हणाले. राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन केले ही बाब देखील योग्य नाही असे श्री.पडते म्हणाले.
स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिलेले आणि राणेंची साथ सोडलेले सतीश सावंत हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत पक्ष नेतृत्वाने आपणास काहीही कळविले नसल्याचीही माहिती श्री पडते यांनी दिली.