परशुराम उपरकर;काहीच काम न केल्याने शेवटची “टर्म” सांगण्याची वेळ…
सावंतवाडी ता.०३:
शेवटची “टर्म” आहे,असे सांगून पालकमंत्री दीपक केसरकर मतदारांना भावनिक आवाहन करत आहेत.मात्र त्यांची ही जादू आता यापुढे चालणार नाही,त्यामुळे त्यांनी निवृत्ती पत्करणेच योग्य,असा टोला मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.मनसेकडून दोडामार्ग तालुका शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख प्रकाश रेडकर यांना सावंतवाडी मतदारसंघात विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.ते उद्या आपला फॉर्म भरणार आहेत आणि ते नक्कीच मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील असा विश्वासही श्री.उपरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
श्री उपरकर पुढे म्हणाले श्री रेडकर यांनी २००५ सालापासून दोडामार्ग तालुक्यात शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.पक्ष संघटना वाढविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.याचा फायदा त्यांना नक्कीच होणार आहे.यातच त्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासंदर्भात शिवसेना पक्षाकडे अर्ज केला होता.मात्र पक्षाने त्याची दखल न घेतल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेचा झेंडा हाती घेतला.आता त्यांना मनसेकडून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.ते उद्या सकाळी आठ वाजता मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थिती आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.असेही त्यांनी सांगितले.
यावेळी गुरुदास गवंडे,राजू कासकर,आशिष सुभेदार,भगवान रेडकर,उल्हास गावडे,मोहन गवस,वासुदेव वरणेकर,रमाकांत रेडकर,अनिल देसाई आदी उपस्थित होते.