निवती पोलिसांची कारवाई : १ लाख २० हजार मुद्देमालासह सहा जण ताब्यात
वेंगुर्ले.ता.३:
वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण-सडा धनगरवाडी येथील एका मांगराच्या पाठी मागील मोकळ्या जागेत विनापरवाना चालणाऱ्या तीन पत्ती जुगारावर निवती पोलिसांनी आज सायंकाळी मिळालेल्या माहिती नुसार धाड टाकली. या धाडीमध्ये सदर ठिकाणी हा गैरप्रकार आढळून आला. पोलिसांनी तेथील एक दुचाकीसह जुगाराचे साहित्य मिळून सुमारे १ लाख २० हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल तसेच सहा जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
निवती पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री. साळुंके यांना म्हापण सडा येथे माळरानावर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्या माहिती नुसार श्री. साळुंखे यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरकर, कांबळी, पांचाळ, कदम या पथकासह सदर घटनास्थळी सायंकाळी अंधाराचा फायदा घेऊन ७ वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. या वेळी त्या ठिकाणी तीन पत्ती जुगार सुरु होता. पोलिसांनी त्या ठिकाणी असलेला सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला. तसेच जुगार खेळण्यासाठी आलेले म्हापण येथील सुनील गणपत करलकर-४८, खवणे मळई येथील सुभाष वासुदेव माळकर-५९, मळई येथील लाडू शिवा पालकर-३५, म्हापण येथील नारायण विठ्ठल म्हापणकर-६३, उदय सूर्यकांत गवंडे-४८ व मळई येथील हरी विठ्ठल मार्गी यांना पोलिसांनी महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) अन्वये ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास निवती पोलिस करीत आहेत.