कणकवली, ता.४. नारायण राणेंची साथ सोडून गेलेल्या सतीश सावंत यांना शिवसेनेकडून आज एबीफॉर्म देण्यात आला. कणकवली मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन करून श्री.सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. श्री.सावंत यांनी कणकवली मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरल्यामुळे सिंधुदुर्गसह राज्यात शिवसेना-भाजप युती भंग होणार की मैत्रीपूर्ण लढती होणार याबाबत जनतेमध्ये उत्सुकता आहे.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात होणारी गळचेपी, आमदार नीतेश राणेंशी असलेेले मतभेद यामुळे आपण राणेंची साथ सोडत असल्याचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी जाहीर केले होते. त्यानंतर ते कुठल्या पक्षात जातात याबाबत जिल्हावासीयांमध्ये उत्सुकता होती. आज सतीश सावंत यांनी आपल्या समर्थकांसह शिवसैनिकांचे शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला.