पुढील आठ दिवसांत आम्ही भाजपत सामील होवू….

93
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नारायण राणे : कणकवलीत भाजपचा मेळावा : २०२४ पर्यंत शतप्रतिशत भाजप

कणकवली, ता.4 :

काल नीतेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आज भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. पुढील आठ दिवसांत आम्हीही भाजपत सामील होऊ तसेच स्वाभिमान पक्षाचेही विलिनीकरण होईल. एवढंच नव्हे तर पुढील काही महिन्यात सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकण भाजपमय झालेले दिसेल अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी आज दिली. आमदार नीतेश राणे यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळायला हवे असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
कणकवली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नीतेश राणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. यानंतर भाजप कार्यालयासमोर राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा झाला. यात नारायण राणे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी राज्य उपाध्यक्ष प्रसाद लाड, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे यांनीही मनोगत मांडले. मेळाव्याला माजी खासदार नीलेश राणे, अ‍ॅड.अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, विनय नातू आदींसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नारायण राणे म्हणाले, आम्हाला आता संपूर्ण कोकण शतप्रतिशत भाजप करायचा आहे. आपण ज्या पक्षात असतो तेथे प्रामाणिक काम करतो. त्यामुळे 1990 मध्ये मी सिंधुदुर्गात शिवसेना आणली आणि अल्पावधीत सिंधुदुर्ग शिवसेनामय झाला. तर 2005 मध्ये संपूर्ण जिल्हा काँग्रेसमय करून दाखवला. काही कारणास्तव मी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यातील सर्व सत्ताकेंद्र भाजपकडे निश्‍चितपणे असतील. आपला आणि भाजप नेत्यांचा जुना संबंध आहे. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेता असताना भाजप नेत्यांचे माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटीवर यांच्यासोबत काम केल्याच्या आठवणींनाही श्री.राणे यांनी उजाळा दिला.
सन 2024 पर्यंत शतप्रतिशत भाजप यादृष्टीने पक्षसंघटनेची वाटचाल सुरू आहे. नारायण राणेंसारखे नेते भाजपत आल्याने आमची चिंता मिटली आहे. राणेंमुळे दोडामार्गपासून पालघर पर्यंत भाजपचीच सत्ता असेल अशी ग्वाही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या भाषणात दिली. तर आमदार नीतेश राणे यांनी कणकवली मतदारसंघ विकासामध्ये अग्रेसर असेल अशी ग्वाही दिली. गेली पाच वर्षे विरोधी बाकावर असतानाही आम्ही कणकवली मतदारसंघात विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. आता सत्तेत असल्यामुळे कणकवली मतदारसंघ विकासाचे मॉडेल होईल असा विश्‍वास नीतेश राणे यांनी व्यक्त केला. आजच्या भाजप मेळाव्यात भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी नीतेश राणेंचा प्रवेश ही झांकी है कोकण अभी बाकी है असे उद्गार काढले. तसेच राणे भाजपत येण्यामध्ये आरएसएसचे कार्यकर्ते असलेल्या डॉ.मिलिंद कुलकर्णी यांचेही योगदान असल्याचे सांगितले. यावेळी जयदेव कदम, स्नेहा कुबल यांनीही मनोगत मांडले. डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

\