राणे-सावंत यांच्यात मुख्य लढत ; काँग्रेस, मनसेकडूनही उमेदवार…
कणकवली, ता.4 :
कणकवली विधानसभा मतदारसंघात ८ उमेदवारांनी आज एकूण १५ अर्ज सादर केले. यात भाजपकडून नीतेश राणे, शिवसेनेकडून सतीश सावंत, मनसेतर्फे राजन दाभोळकर, काँग्रेसकडून सुशील राणे, भाजपचे युवा नेते संदेश पारकर, बहुजन मुक्ती पार्टीचे वसंतराव भोसले, बहुजन समाज पार्टीचे विजय साळसकर आणि वंचित आघाडीच्या अॅड.मनाली वंजारे यांचा समावेश आहे. कणकवली मतदारसंघात राणे आणि सावंत यांच्यात मुख्य लढत आहे. या दोहोंमध्ये पुढील काळात काटे की टक्कर पहायला मिळणार आहे.
कणकवली मतदारसंघात संदेश पारकर यांनी दोन अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. अॅड. मनाली संदीप वंजारे यांनी अपक्षासह दोन अर्ज दाखल केले. तर नीतेश राणे यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारीबरोबर अपक्ष असे तीन अर्ज दाखल केले. काँग्रेसचे सुशील अमृतराव राणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजन शंकर दाभोळकर आणि बहुजन मुक्ती पार्टीचे वसंतराव भाऊसाहेब भोसले यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून सतीश जगन्नाथ सावंत यांनी शिवसेनेचे दोन, अपक्ष दोन असे चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. विजय सूर्यकांत साळसकर यांनी बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.